25.3 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home यशोगाथा घरीच अभ्यास करून साकेत बनला नायब तहसीलदार

घरीच अभ्यास करून साकेत बनला नायब तहसीलदार

वाशिममध्ये राहूनच राज्य सेवा परीक्षेत मिळविले यश यशाचे शिखर अजून गाठायचे आहे, अभ्यास सुरूच ठेवणार

0
618

वाशिम येथील सिव्हील लाईन्स परिसरातील साकेत श्रीकांत राजे या युवकाने घरीच राहून, स्पर्धा परीक्षेच्या कोणत्याही शिकवणीला न जाता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०१९ मध्ये घेतलेल्या राज्य सेवा परिक्षेत यश संपादन केले आहे. आयोगाने नायब तहसीलदार पदासाठी त्याचे नामांकन केले आहे. मात्र, यावरच न थांबता स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उच्च पदावर जाण्यासाठी पुढेही अभ्यास सुरु ठेवणार असल्याचे साकेत सांगतो.

साकेतचे वडील श्रीकांत राजे हे होमिओपॅथीचे डॉक्टर आहेत, तर आई श्रद्धा या गृहिणी. साकेतचे प्राथमिक शिक्षण वाशिम येथील लॉयन्स विद्या निकेतन येथे झाले, तर माध्यमिक शिक्षण वाशिम येथीलच जवाहर नवोदय विद्यालयात झाले. सुरुवातीपासूनच सैन्यात भरती होवून देशाची सेवा करण्याची इच्छा असलेल्या साकेतने इयत्ता ११ व १२ चे शिक्षण औरंगाबाद येथील शासकीय सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था अर्थात ‘एसपीआय’मधून पूर्ण केले. २०११ मध्ये त्याला हवाई दलात फायटर पायलट पदासाठी नामांकनही मिळाले, मात्र छोट्याशा अपघातात झालेल्या जखमेमुळे त्याचे फायटर पायलट बनण्याचे स्वप्न हिरावले. सैन्य दलात भरती होण्याची संधी हातून गेल्यानंतर शासकीय सेवेत प्रवेश करण्याचे साकेतने ठरविले.

दरम्यान, २०१० मध्येच त्याने वाशिम येथील तुळशीराम जाधव महाविद्यालयात विज्ञान शाखेत पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. २०१३ मध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली. सुरुवातीला केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांची सोबतच तयारी सुरु केली. मात्र, दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम वेगळा असल्याने व पुरेसा वेळ देणे शक्य न झाल्याने सन २०१४ व २०१५ मध्ये परीक्षेत अपयश आल्याचे साकेत सांगतो. त्यानंतर २०१६ पासून पूर्णवेळ महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले.

सन २०१८ मध्ये राज्य सेवा मुख्य परीक्षेत ४६५ गुण मिळाले व निवड यादीत येण्याची संधी केवळ एका गुणाने हुकली. त्यावेळी काहीसे नैराश्य आले. मात्र, मंत्रालयातील अवर सचिव रा. ना. मुसळे, मित्र विशाल जोंधळे तसेच कुटुंबीयांनी धीर दिला व अभ्यास सुरु ठेवण्यास सांगितले. पुन्हा नव्या जोमाने तयारी सुरु केली. स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी इंटरनेटचाही वापर केला. २०१९ मध्ये दिलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षेचा निकाल आल्यानंतर माझी नायब तहसीलदार पदासाठी निवड झाल्याचे समजले. गेल्या ५-६ वर्षापासून करीत असलेल्या मेहनतीचे हे फळ आहे. पण अजूनही अपेक्षित यश मिळालेले नाही, त्यामुळे यापुढेही अभ्यास सुरूच ठेवणार असल्याचे साकेतने सांगितले.

अभ्यासातील सातत्य हेच यशाचे गमक

मी २०१४ मध्ये स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी कोणत्याही मोठ्या शहरात न जाता किंवा क्लास न लावता घरीच राहून अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीचे दोन वर्षे युपीएससी आणि एमपीएससी परीक्षांची सोबतच तयारी केल्याने अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र, नंतर एमपीएससी परीक्षांवर लक्ष केंद्रित करून अभ्यास केला. याकरिता विविध पुस्तके आणि इंटरनेटचाही उपयोग केला. अपयश आले तरी खचून न जाता, अभ्यासात सातत्य ठेवल्याने यश मिळाले. मंत्रालयातील अवर सचिव रा. ना. मुसळे, मित्र विशाल जोंधळे तसेच कुटुंबीयांनी वेळोवेळी पाठबळ दिल्याने माझी इथपर्यंत वाटचाल झाली. अजून बराच पल्ला गाठायचा असून त्यासाठी अभ्यास सुरूच ठेवणार आहे, असे साकेत राजे याने सांगितले.