25.3 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home विदर्भ महाबीजकडे नवीन व प्रचलित भात बियाण्यांची शृंखला उपलब्ध

महाबीजकडे नवीन व प्रचलित भात बियाण्यांची शृंखला उपलब्ध

0
433

भंडारा,दि.22 :- महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ  महाबिजद्वारे खरीप 2020 हंगामात भंडारा व गोंदिया जिल्हयात भात पिकांच्या निरनिराळया नवीन व प्रचलित वाणाचे बिजोत्पादन कार्यक्रमामधून तयार करण्यात आलेले प्रमाणित बियाणे व शासनाचे बिज प्रमाणीकरण यंत्रणेच्या देखरेखीखाली प्रक्रिया झालेले नवीन व प्रचलित भात वाणाचे प्रमाणित बियाणे शेतकरी बांधवासाठी बाजारात उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत.

शेतकऱ्यांनी प्रचलित वाणासोबतच कृषी विद्यापिठाद्वारे नवीन वाणाच्या बियाणांचा वापर करुन उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. कृषी विद्यापिठाकडून प्राप्त झालेले नवीन वाण हे प्रचलित वाणापेक्षा जास्त उत्पन्न देणारे, रोग व किडींना प्रतिकार क्षमतेमध्ये सरस असल्यामुळे शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्याची वाण निहाय व कालावधी निहाय संक्षिप्त माहिती शेतकऱ्यांना देण्यात येत आहे.

कमी कालावधीचे धानाचे वाण –  सीओ-51- कालावधी 105 ते 110 दिवस न लोळणारे व मध्यम दाणा, भरघोस उत्पादन देणारे, मध्यम उंचीचे वाण, तपकिरी तुडतुडे किडीस व ब्लास्ट रोगास अंशत: प्रतिकारक आहे. कर्जत-3 – 110 ते 115 दिवसात परिपक्वता, आखुड व ठोकळ दाणे, कोरडवाहू व बागायती लागवडीस योग्य नत्र खतास उत्तम प्रतिसाद देतो. डी.डी.आर.46-  कालावधी 110 ते1 15 दिवस, दाण्याचा आकार मध्यम असून प्रचलित वाण आयआर-64 या वाणास पर्यायी  ठरु शकतो.

मध्यम कलावधीचे धानेचे वाण –एमटीयु-1153- कालावधी 125 ते 130 दिवस, दाणा जाड असून सदर वाण एमटीयु-1010  या वाणास पर्यायी ठरु शकतो. फुले समृध्दी – 125 ते 130 दिवसात परिपक्व होणारे प्रचलित वाण असून उत्पन्न 45 ते 50 क्विंटल/हेक्टर, दाण्याचा रंग पिवळसर ते गर्द पिवळा, न पसरणारा व न गळणारा वाण आहे. साकोली-9- मध्यम कालावधीचे वाण, 130 ते  135 दिवस उशिरा लागवडीस योग्य आहे.

जास्त कालावधीचे धानाचे वाण-  पीकेव्ही एचएमटी – 135 ते 140 दिवसात परिपक्व होणारे प्रचलित वाण, बागायती पुर्नलागवड पध्दतीस योग्य, करपा, कडाकरपा व इतर किडीस साधारण प्रतिकारक्षम, आखुड व बारीक दाणे, मऊ व मोकळा आहे. पीकेव्ही किसान- कमी उंचीचे न लोळणारे वाण, कालावधी 130-135  दिवस, दाणा बारीक असून भाताची प्रत उत्तम आहे. लिफ ब्लास्ट व करपा रोगास प्रतिकारक्षम आहे. पीडीकेव्ही तिलक- 140-145 दिवसात परिपक्व होणार वाण असून दाणा अतिबारीक आहे. भात मऊ,मोकळा व खाण्यास रुचकर आहे.

धान बियाणे व्यतिरिक्त तुर बियाणे, हिरवळीचे खत बियाणे, ढेंचा, भाजीपाला बियाणे तसेच जैविक खते व बुरशीनाशक इत्यादी पुरवठयाचे नियोजन महाबिजतर्फे करण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ अवश्य घ्यावा, असे आवाहन महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक वाय. एच. कामडी यांनी केले आहे.