मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे तिन्ही महिन्याचे पगार दिवाळीपूर्वी दिले जाणार अशी घोषणा केल्यामुळे अखेर एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. आज परिवहन मंत्री अनिल परब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यांत बैठक झाली. राज्य सरकारने या बैठकीत परिवहन महामंडळाला एक हजार कोटींचे पॅकेज मंजूर केल्यामुळे आता परिवहन महामंडळाला आता एसटी कर्मचाऱ्यांचे पगार देणे शक्य होणार आहे.
याबाबत अनिल परब म्हणाले की, एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न खूप गंभीर होता. कोरोनामुळे झालेली महामंडळाची आर्थिक परिस्थिती पाहता पैशांची जमवाजमाव करणे कठीण होते. वेगवेगळ्या माध्यमातून गेल्या दोन-चार दिवसांपासून प्रयत्न सुरु होते. गेल्या तीन महिन्याचे एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन थकित होते. त्यापैकी एका महिन्याचा पगार दिवाळीसाठी काल देण्यात आला.
आज यासंदर्भात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याबरोबर बैठक झाली. नेहमी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न उभा होतो, म्हणून आज अजित पवारांकडे मी सहा महिन्यांसाठी पॅकेज द्या अशी मागणी केल्यानंतर एसटीला एक हजार कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना तिन्ही महिन्याचे वेतन देणार आहोत. याबाबतची फाईल आज पुढे पाठवली असून कर्मचाऱ्यांना दोन दिवसात पगार मिळेल, अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे.