ब्रेकींग- गडचिरोली जिल्ह्यात सी 60 व नक्षल्यात गोळीबार,13 नक्षली ठार

0
68
file photo

गडचिरोली(अशोक दुर्गम)दि.21– राज्यातील नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोलीत पुन्हा एकदा पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे.यात 13 नक्षली ठार झाले असून राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे नागपूरवरुन गडचिरोलीकरीता रवाना झाले आहेत. महाराष्ट्र पोलिसांच्या सी-60 युनिट आणि नक्षलवाद्यांमध्ये पैदी जंगलात झालेल्या पोलीस-चकमकीत ठार झालेल्या नक्षल्यांची संख्या 13 असल्याची माहिती गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक संदीप पाटील यांनी दिली. त्यापैकी एटापल्ली जंगल परिसरातून  6 नक्षलवाद्यांचे मृतदेह महाराष्ट्र-छत्तीसगड बॉर्डरवरील गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्लीच्या कटीमाच्या जंगलामधून ताब्यात घेण्यात आले आहेत. हा परिसर धानोरा तालुक्याला लागून आहे.

गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळपासून नक्षलविरोधी अभियान राबविण्यात येत आहे. जंगलात अभियान सुरू असताना नक्षलवाद्यांचे शिबिर सुरू असणाऱ्या ठिकाणी पोलिसांची तुकडी पोहचली. पोलीस दिसताच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात पोलिसांनी गोळीबार सुरू केला. या चकमकीत १३ नक्षल ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. चकमक अजूनही सुरू असून मृतदेह एकत्र करण्याचं काम सुरू असल्याचं पोलीस अधीक्षक गोयल यांनी सांगितलं. एकूण किती नक्षलवादी ठार झाले आहेत ही माहिती अभियान संपल्यावर सांगता येईल असं ते म्हणाले.

कसनसुर येथे नक्षलवादी दल एकत्र आले होते. सध्या तेंदू हंगाम सुरू आहे. या हंगामात नक्सल तेंदू कंत्राटदार यांच्याकडून मोठी खंडणी वसूल करतात. त्याचे नियोजन करण्यासाठी नक्षलवाद्यांची बेठक सुरू होती अशी माहिती आहे. खबऱ्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर रात्रीपासून पोलिसांनी अभियानाची तयारी सुरू केली होती. याच अभियानादरम्यान आज सकाळपासूनच पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे.