चरणजीत सिंह चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री

0
41

चंदीगड : २५ सप्टेंबर – काँग्रेस नेते चरणजीत सिंह चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री होतील, असे ट्विट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरीश रावत यांनी केले आहे. आज दिवसभर चाललेल्या बैठकीनंतर चरणजीत सिंह चन्नी यांच्या नावावर काँग्रेस हायकमांडकडून शिक्कामोर्तब करण्यात आलंय. यापूर्वी सुखजिंदर सिंह रंधावा यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, चरणजीत सिंह चन्नी यांच्या नावाची घोषणा हरीश रावत यांनी केली आहे. तसेच चन्नी हे संध्याकाळी साडे सहा वाजता राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापन करण्याचा दावा करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
पंजाबच्या मुख्यमंत्रीपदासाठी सुखजिंदरसिंग रंधावा, नवज्योतसिंग सिद्धू, सुनिल जाखड यांच्या नावांची चर्चा होती. त्यात सर्वाधिक चर्चेत सुखजिंदरसिंग रंधावा यांचं नाव होतं. मात्र, या सर्व नेत्यांना डावलून पंजाबमधील दलित नेते चरणजीत सिंह चन्नी यांना मुख्यमंत्रीपदाची संधी काँग्रेसकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, चरणजीत सिंह चन्नी यांच्या निवडीनंतर सर्वाधिक चर्चेत राहिलेले सुखजिंदर सिंग रंधावा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “हा हायकमांडचा निर्णय असून मी त्याचे स्वागत करतो. चन्नी माझ्या लहान भावासारखे आहेत. मी अजिबात निराश नाही,” असं त्यांनी म्हटलंय.