शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर महाराष्ट्रातल्या सत्तासंग्रामाला शुक्रवारी हिंसक वळण लागले. कुर्ल्याचे शिवसेना आमदार मंगेश कुडाळकरांच्या कार्यालयावर काही लोकांनी हल्ला केला. त्यांनी गेटची तोडफोड केली. अहमदनगरमध्ये बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे यांच्या फोटोला काळे फासण्यात आले. तोडफोड करणारे लोक शिवसेनेचे असल्याचा आरोप बंडखोर आमदारांच्या समर्थकांनी केला आहे. तोडफोडीच्या घटनेनंतर पोलिसांनी राज्यात हाय अलर्ट जारी केला आहे.
शिंदेच्या किल्ल्यात संचारबंदी
ठाण्यात कायदा व सुव्यवस्था कडेकोट करण्यात आली असून, परिसरात शांतता राखण्यासाठी विविध निर्बंध लादण्यात आले आहेत. एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील हिंसाचार आणि कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती पाहता पुढील 5 दिवस 30 जूनपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परिसरात लाठ्या, शस्त्रे, पोस्टर जाळणे, पुतळे जाळणे यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय घोषणाबाजी किंवा स्पीकरवर गाणी वाजवण्यासही परवानगी नाही.
मतदारसंघात मेळावे घ्या- शिंदेंचे आदेश
गुवाहाटी येथे एकनाथ शिंदे गटाची बैठक संपली. आमदारांना आपापल्या मतदारसंघात मेळावे घेण्याचे आदेश शिंदे यांनी बैठकीत दिले. सभेतून बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार पुढे न्या. आम्ही शिवसेनेत आहोत. स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करा तसेच सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र या असेही ते म्हणाले.
आमदारांना सभा घेण्याच्या सूचना
लोकांना सांगा की तुमची भूमिका पहिल्यापासून हिंदुत्वाची आणि मराठीची आहे. उद्धव ठाकरे यांनी काल विभागप्रमुखांची बैठक घेण्याचे आदेश दिले होते. आता एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरेंपाठोपाठ आपल्या आमदारांना सभा आणि रॅली काढण्याचे आदेश दिले आहेत.
अपात्रेबाबत अद्याप निर्णय नाही
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी तसेच प्रधान सचिव हे विधानभवनात आहेत. त्यांच्यात रात्री अकरापर्यंत चर्चा सुरु होती. परंतू सोळा जणांची आमदारकी रद्द करण्याबाबत अजून ठोस निर्णय झाला नाही. उद्या उपसभापती बंडखोर 16 आमदारांना कारणे दाखवा नोटीस पाठवून उत्तर मागणार आहेत. या 16 आमदारांचे म्हणणे ऐकूण घेतले जाईल त्यानंतप सोमवारी यावर निर्णय अपेक्षित आहे.
बंडखोरांनी स्वतःचे दरवाजे बंद केले
सोळा आमदारांवर अपात्रेतेची कारवाई होईल अशी आशा आहे. धादांत खोटे बोलणाऱ्या माणसांनी स्वतःहून त्यांचे शिवसेनेतील दरवाजे बंद केले आहेत. ते कायदेशिरदृष्ट्या अडचणीत येतील असेही शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी सांगितले.
लाइव्ह अपडेट्स:
- आजच्या बैठकीत शिंदेची शिवसेना नेतेपदावरुन हकालपट्टी होण्याची शक्यता
- शिंदे गट राज्यपालांना पत्र देण्याच्या तयारीत
- गुवाहटीत आज दुपारी दोन वाजता पुन्हा बंडखोर आमदारांची बैठक
- भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक
- शिवसेनेत आजही बैठकीचे सत्र कायम; आज राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक
- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ‘मातोश्री’वर दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत ते राज्यातल्या राजकीय घडामोडीवर करणार चर्चा करणार असल्याचे समजते.
- महाराष्ट्रातल्या सत्तासंग्रामाला शुक्रवारी हिंसक वळण लागले. कुर्ल्याचे शिवसेना आमदार मंगेश कुडाळकरांच्या कार्यालयावर काही लोकांनी हल्ला केला. त्यांनी गेटची तोडफोड केली. अहमदनगरमध्ये बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे यांच्या फोटोला काळे फासण्यात आले. तोडफोड करणारे लोक शिवसेनेचे असल्याचा आरोप बंडखोर आमदारांच्या समर्थकांनी केला आहे. तोडफोडीच्या घटनेनंतर पोलिसांनी राज्यात हाय अलर्ट जारी केला आहे.
- संकटकाळात पक्षाने साधी विचारपूसही केली नाही. कर्करोगासारख्या दुर्धर आजाराला तोंड देताना आणि संकटकाळात पक्षाकडून साधी विचारपूस देखील नाही, याचे मनात शल्य आहे. मनाला अजूनही यातना होतायत. शिवसेना सोडून यशवंत जाधवांनी कधीही दुसरा विचार केला नाही. या शिवसैनिकांनी आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. यशवंत जाधव कधीही बईमानी करणार नाहीत. त्यामागे काही तरी कारण आहे. त्याचं कारणही तुम्ही समजून घ्यायला हवं, अशी प्रतिक्रिया बंडखोर शिवसेना नेते यशवंत जाधवांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव यांनी दिलीय.
- राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ आज संध्याकाळी साडेसहा वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार असून, महाविकास आघाडी सरकार टिकवण्यासाठी आखल्या जाणाऱ्या पुढच्या रणनितीबाबत चर्चा करणार आहे. मविआ सरकार बहुमतात आहे. सर्वजण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पाठिशी उभे आहेत, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. ते मुंबईत बोलत होते.
- ठाकरे, शिवसेना हे नाव न वापरता जगून दाखवा, असे आव्हान मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर एकनाथ शिंदे यांना दिले. उद्धव यांनी शिवसेना भवनातील जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत ऑनलाइन मार्गदर्शन केले. जे सोडून गेले त्यांचे वाईट का वाटावं. मी जिद्द सोडली नाही. हे सारे भाजपने केले, त्यांची आग्र्याहून सुटका करावीच लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
- शिवसेनाभवनात एक बैठक झाली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुखांना मार्गदर्शन केले. आदित्य म्हणाले, कुटुंबप्रमुखाला धोका देता याचे वाईट वाटते. धोका मित्रपक्षांनी दिला असता, तर समजू शकलो असतो. राज्यातील सर्व जनता उद्धव ठाकरेंसोबत असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
- शिंदेसेनेच्या आकड्यात वाढ. बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या गटात आमदार दिलीप लांडे पोहचले. लांडे यांचे उत्साहात स्वागत.
- शिवसेना भवनातील बैठकीला मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राहणार गैरहजर. आदित्य ठाकरे करणार मार्गदर्शन.
- मुंबईत देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी भाजप नेत्यांची खलबते सुरू आहेत. पक्षाचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित असून, आगामी रणनीतीवर चर्चा सुरू असल्याचे समजते.
- सध्याची परिस्थिती पाहता राज्य सरकारकडून अंधाधुंद निर्णय घेणे सुरू. या प्रकारात राज्यपालांनी हस्तक्षेप करावा. कोश्यारी यांच्याकडे भाजपची पत्रातून मागणी. येथे वाचा पूर्ण बातमी
- शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षनेतेपदासाठी विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी अजय चौधरी यांना मान्यता दिली आहे.

रायगडमध्ये शिंदेंचे पोस्टर
रायगडमध्ये शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी शुभेच्छापर पोस्टर लावले आहेत. शिंदेंना शुभेच्छा देणाऱ्या पोस्टरवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फोटो नसून, स्व. बाळासाहेब ठाकरे आणि अनंत दिघे यांचे फोटो पोस्टरवर लावण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या सर्व आमदारांचे देखील अभिनंदन करण्यात आले आहे. पोस्टरवर लिहण्यात आले आहे की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्ववादी विचार पुढे नेणाऱ्या आणि धर्मवीर आनंद दिघे यांनी दिलेले शिकवण पुढे नेणाऱ्या सर्व आमदारांना शुभेच्छा. एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी हे पोस्टर दक्षिण रायगडच्या माणगाव, गोरेगाव, लोणेरे आणि महाड या भागात लावले आहेत. आमदार भरत गोगावळे यांच्या मुलाने देखील शिंदेचे पोस्टर लावले आहे.
- सध्याची परिस्थिती पाहता हस्तक्षेप करा. भाजपचे राज्यपालांना पत्रातून साकडे.
- हम हार मानने वाले नहीं, रस्त्यावरची लढाई पण जिंकू. शरद पवार यांच्यासोबत झालेल्या शिवसेना नेत्यांच्या बैठकीनंतर संजय राऊत आक्रमक.
- मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर पोहचले. तर शिवसेना नेत्यांची सेना भवनावर बैठक. सेना भवनाच्या सुरक्षेत केली वाढ.
- बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या सोबत असणाऱ्या 40 आमदारांच्या पीएसओवर (खासगी सचिव अधिकारी, कमांडो आणि हवालदार) उद्धव ठाकरे सरकार कारवाई करणार असल्याचे समजते. शिवसेना आमदार बंड करून महाराष्ट्र सोडून जात असताना या सर्व अधिकाऱ्यांनी प्रशासन आणि गुप्तचर विभागाला माहिती दिली नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईचे आदेश देण्यात आलेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीएमओने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना संबंधित जिल्ह्यातील आमदारांच्या या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले.
- राज्यातील महापालिका निवडणुका सहा महिने लांबणीवर पडण्याची शक्यता ?
- मंत्री झाले चिंताक्रांत:ठाकरे सरकार पडण्याच्या भीतीने मंत्र्यांची घालमेल वाढली; फाइली क्लिअर करण्यासाठी मंत्रालय फुल्ल.
- पुण्यात शरद पवारांसोबत शिवसेना नेत्यांची बैठक सुरू.
- राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील. फोटो आला समोर. त्यामुळे शिवसैनिक आक्रमक. क्षीरसागर यांच्या घरावर काढला मोर्चा.
- सत्तासंघर्षासाठी अमर्याद खर्च होणारा पैसा ईडीला दिसत नाही का, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांचा सवाल.
- शिवसेना नेते संजय राऊत यांचे ट्विट. खरीप हंगामात कृषी मंत्री प्रत्येक आठवड्यात राज्यातील पेरणीचा आढावा घेत असतात. सध्या राज्यात पाऊसकमी आहे. पेरण्या लांबत आहेत. राज्याचे कृषिमंत्री भुसे हे आसाम येथे चिंतन शिबिरात जाऊन बसल्याने शेतकरी वाऱ्यावर आहे. मुख्यामंत्री कृपया आपण लक्ष द्या, असे आवाहन त्यांनी केले आहे.
- संजय राऊत यांचे ट्विट. महाविकास आघाडीचे सरकार वाचवण्याचा प्रयत्न केला, तर शरद पवार यांना घरी जाऊ देणार नाही .रस्त्यात अडवू. अशी धमकी भाजपचा एक केंद्रीय मंत्री देतो. ही भाजपची अधिकृत भूमिका असेल, तर तसे जाहीर करा. सरकार टिकेल किंवा जाईल, पण शरद पवार यांच्याबाबत अशी भाषा महाराष्ट्राला मान्य नसल्याचे सडेतोड उत्तर.
- गुवाहाटी पोलिसांनी शिवसेना नेते संजय भोसले यांना ताब्यात घेतले आहे. भोसले हे साताऱ्यातील माणच्या बिजवडी येथील शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख आहेत. शिंदे गटाला ठाकरेंकडे परत येण्याचे आवाहन करण्यासाठी ते गेले होतो.
- संजय राऊतांची भाजपवर टीका, नारायण राणेंच्या ट्विटवरील पवारांना दिलेल्या धमकींवरून सवाल- धमक्या देणं भाजपची संस्कृती आहे का?
- नॉट रिचेबल असलेले भास्कर जाधव चिपळूणमध्ये असल्याचा खुलासा त्यांनी स्वत: केला.
- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिल्लीसाठी रवाना, तर देवेंद्र फडणवीस दिल्लीहून मुंबईत परतले.
- भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात म्हटले की, सत्ता परिवर्तनाबद्दल काहीच माहित नाही.भाजपकडे अजून कोणताही प्रस्ताव आलेला नाही, अपक्ष आमच्यासोबत ठाम राहिले.
- आमदार संतोष बांगर शिवसेनेतच, परभणी रेल्वेस्थानकावर जल्लोषात स्वागत; हिंगोली जवळाबाजार, औंढा येथेही कार्यकर्त्यांनी केला सत्कार
- सरकारच्या अस्थिरतेने सर्वपक्षीय मंत्र्याची धावपळ; तिन्ही पक्षाच्या मंत्र्यांना फाईल्स क्लिअर करण्याचे आदेश
- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची प्रकृती स्थिर; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता.
- मातोश्रीवर शिवसेनेच्या सर्व खासदारांची आज संध्याकाळी 7 वाजता बैठक
- शिवसेना पक्षप्रमुख तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी 1 वाजता मातोश्रीवर राज्यातील सर्व शिवसेना जिल्हाप्रमुख आणि तालुका शाखा प्रमुखांची बैठक घेणार आहेत.
- ठाणे महानगर पालिकेचे 60 शिवसेनेचे नगरसेवक एकनाथ शिंदेंच्या गटात सहभागी
- महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत आहेत. शिवसेना आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होण्याची प्रक्रिया सुरूच आहे. शुक्रवारी सकाळी मुंबईतील शिवसेनेचा आणखी एक आमदार गुवाहाटीला रवाना झाला आहे. त्यात चांदिवलीचे आमदार दिलीप लांडे यांचा समावेश आहे. शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे 39 आमदार आणि 14 अपक्ष आहे. म्हणजेच, 53 आमदारांसह शिंदे यांची शिवसेना मजबूत होत आहे. आमदारांची संख्या आणखी वाढू शकते.
- माझ्याकडे 50 पेक्षा जास्त आमदार आहेत. दोन तृतीयांशापेक्षा जास्तीचे आमदार आमच्याकडे आहेत. शिवसेनेकडून 10 नोटीसा आल्या तरी आम्ही घाबरत नाहीत. अशा प्रकारच्या चुकीच्या नोटीसा पाठवून आम्हाला घाबरवण्याचे प्रयत्न करू नये, बाळासाहेंबाची महाशक्ती आमच्या पाठिशी आहे, असा इशारा शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. चांदीवलीचे आमदार दिलीप लांडे गुवाहाटी दाखल झाले असून, ते शिंदे गटात सामिल झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडे आता 39 आमदारांचे संख्याबळ आहेत.
- महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी स्वतःला विधिमंडळ पक्षनेते म्हणून घोषित केले आहे. त्यांनी तशा आशयाचे उपसभापती नरहरी झिरवाल यांना एक पत्र पाठवले असून, त्यात त्यांच्या समर्थनार्थ 37 आमदारांच्या सह्या आहेत. शिंदे यांनी या पत्राची प्रत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि विधान परिषदेचे सचिव राजेंद्र भागवत यांनाही पाठवली आहे. आपल्यासोबत 49 आमदार असल्याचा दावा शिंदे करत आहेत. रात्री उशिरा आणखी काही आमदारही गुवाहाटीमध्ये पोहोचले आहेत. एकूणच शिंदे यांची शिवसेना मजबूत होत आहे. बहुधा शिंदे आज भाजपसोबतच्या युतीबाबत काही मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
- शिवसेनेचे आणखी एक आमदार नॉट रिचेबल; भास्कर जाधव संपर्काबाहेर
