हावडा-मुंबई मार्गावर दरेकसाजवळ मालगाडीचे डब्बे रुळावरून घसरले

0
35

रेल्वे गाड्यांना विलंब, रेल्वे मार्ग दुरुस्तीचे काम सुरु

गोंदिया: हावडा-मुंबई मार्गावरील सालेकसा तालुक्यातील दरेकसा रेल्वे फाटकाजवळ डोंगरगडकडून-गोंदियाकडे येणाऱ्या एका मालगाडीचे डब्बे स्लिप झाल्याने मालगाडी काही अंतरापर्यंत घासत गेली. सुदैवाने यात कुठलीही जीवीत हानी झाली नाही. ही घटना बुधवारी (दि.२) दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. मात्र यामुळे गोंदिया-डोंगरगड दरम्यान रेल्वे वाहतूक पूर्णपणे खोळंबली होती.

हावडा-मुंबई मार्गावर मालगाड्यांची सर्वाधिक वाहतूक होते. बुधवारी दुपारच्या सुमारास डोंगरगडवरुन कोळसा घेवून गोंदियाकडे येणाऱ्या एका मालगाडीचे डब्बे रुळावरुन दरेकसा रेल्वे फाटकाजवळ स्लिप झाले. दोन ते डब्बे काही अंतरावर घासत गेले, ही बाब इंजिन चालकाच्या लक्षात येताच त्यांने ब्रेक मारुन गाडी थांबविली. मात्र काही अंतरापर्यंत गाडीचे चाक रुळाच्या बाजुला घासत गेल्याने रेल्वे रुळाला थोडे तडे गेले. त्यामुळे रेल्वे विभागाने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबविली. तसेच क्रेन बोलावून थोडे स्लिप झालेले डब्बे सरळ करुन गाडी पुढे नेण्यात आली. मात्र रुळ दुरुस्तीचे काम सुरु असल्याने या मार्गावरील सर्व गाड्या दुपारी ४ वाजतापासून ठप्प झाल्या होत्या.सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र डब्बे घासल्याने रुळाला थोडे तडे गेल्याने ते दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे. सायंकाळी ७.३० वाजतापर्यंत रेल्वे रुळ दुरुस्तीचे काम सुरुच होते. त्यामुळे या मार्गावरील अनेक रेल्वे गाड्या चार ते पाच तास उशीेराने धावत होत्या. दरम्यान या मार्गावरील वाहतूक केव्हा सुरळीत होईल या संदर्भातील माहिती घेण्यासाठी रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.