अक्कू यादव हत्येमागे नक्षलवादी प्रेरणा:नक्षलवाद्यांच्या श्रद्धांजली पत्रकातून झाला खुलासा; महिलांनी केली होती हत्या

0
16
file photo

गोंदिया- नागपुरातील कुख्यात गुंड अक्कू यादव याची २००४ मध्ये जिल्हा सत्र न्यायालयात महिलांनी सामूहिक हत्या केली होती. या हत्याकांडामागे नक्षलवाद्यांची प्रेरणा असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. नक्षलवाद्यांनी जारी केलेल्या श्रद्धांजली पत्रकात याचा उल्लेख असून अनेक खळबळजनक खुलासे करण्यात आले आहेत.

नक्षलवाद्यांच्या केंद्रीय कमिटीचा वरिष्ठ सदस्य आणि महाराष्ट्र, मध्य प्रदेश व छत्तीसगडच्या नक्षलवाद्यांच्या स्पेशल झोनल कमिटीचा सचिव मिलिंद तेलतुंबडेच्या पोलिस एन्काउंटरमधील मृत्यूला एक वर्ष पूर्ण झाले आहे. नक्षलवाद्यांकडून गडचिरोलीतील मर्दिनटोलाच्या जंगलात १३ नोव्हेंबर २०२१ रोजी पोलिस एन्काउंटरमध्ये मारल्या गेलेल्या सर्व २७ नक्षलवाद्यांना एका पत्रकाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. एकूण ६५ पानांच्या या पत्रकात नक्षलवाद्यांनी अनेक खुलासे केले आहेत. २००४ मध्ये नागपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात जमावाकडून झालेल्या अक्कू यादव या कुख्यात गुंडाच्या सामूहिक हत्या प्रकरणाच्या मागे नक्षलवाद्यांची प्रेरणा होती, असे या पत्रकात मान्य करण्यात आले आहे.

अक्कू यादवची हत्या करणाऱ्या महिलांना नक्षली नेता मिलिंद तेलतुंबडेची प्रेरणा होती. महिलांनी त्यांच्या विरोधात होणाऱ्या अत्याचार विरोधात पेटून उठावे, या मिलिंद तेलतुंबडे याच्या शिकवणीतून प्रेरणा घेऊनच ही घटना घडली होती, असा दावा या पत्रकात करण्यात आला.