मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात मयुर ठाकरेचा प्रतापचक्क मुख्यमंत्र्यांचाच ओएसडी बनला

0
8

बनावट कागदांच्या आधारे वेतनही घेतले…बड्या अधिकाऱ्यांना आदेशही दिलेत…

मुंबई:-राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात बनावट दस्तावेजांचे आधारे रुजू झाल्याचे भासवित चक्क मुख्यमंत्र्यांचा ओएसडी म्हणून वावरणाऱ्या ठाकरे या नावाची मंत्रालय परिसरात सध्या खमंग चर्चा होत असून या ठाकरेच्या प्रतापाचे अनेक किस्से या निमित्याने बाहेर पडत आहेत. मात्र हे वृत्त जग जाहीर झाल्यास मुख्यमंत्री शिंदे व त्यांचे कार्यालयाची मोठी नामुष्की होण्याचे भीतीने ठाकरेचे हे प्रकरण दाबून ठेवण्याचा प्रयास मुख्यमंत्री कार्यालयाकडून केला जात आहे.

राज्याचे मुख्यमंत्री यांचे कार्यालयात एक तोतया ओएसडी सापडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. या ओएसडीची अधिक माहिती घेतली असता, तो अमरावती जिल्ह्यातील अचलपूर नगरपालिकेत कर वसुली निरीक्षक या पदावर कार्यरत असल्याचे समोर आले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे त्याचे नाव मयूर ठाकरे असून अचलपूरचे आमदार बच्चू कडू हे मागील सरकारमध्ये मंत्री असताना त्यांनीच या ठाकरेला स्वतःचा ओएसडी म्हणून मुंबईत नेल्याचे समोर आले आहे.

अचलपूर पालिकेत कर वसुली निरीक्षक पदाचे काम करतानाच हा इसम आमदार बच्चू कडू यांचे नजरेत भरला. त्याची तरतरी पाहून आमदार कडू यांनी त्याचे निर्धारित कामाव्यतिरिक्त त्याच्याकडे अपंगांचीही कामे करण्याची जबाबदारी सोपविली. आमदार कडूंना प्रभावीत करण्याकरिता त्याने अपंगांची कामे अतिशय मन लावून केली. अनेक शासकीय योजनांचा लाभ अपंगांना करवून दिला. त्यामुळे आमदार कडूंची मर्जी त्याने चांगलीच संपादन केली.महाविकास आघाडीमध्ये मंत्री झाल्यावर बच्चू कडू यांनी मयूर ठाकरे ह्याला आधी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात डेप्युटेशनवर नियुक्त करून घेतले. त्यानंतर त्याला आपला ओएसडी म्हणून थेट मंत्रालयात नेले. तेथे तो नामदार कडू यांचेकरिता अपंगांची कामे करू लागला. यानिमित्ताने त्याने मंत्रालयात प्रचंड ओळखी करून घेतल्या. या आधारावर त्याने मोठी झेप घेण्याची योजना बनवली. त्याकरिता त्याने अनेक बनावट दस्तावेज तयार केले. अचलपूर पालिकेतून त्याने प्रतिनियुक्तीचा आदेश व मंत्रालयात रुजू होण्याचे नियुक्तीपत्र तयार केले. त्यानंतर थेट मुख्यमंत्री कार्यालयात ओएसडी असल्याचे बनावट ओळखपत्रही तयार केले.त्या आधारावर तो या ठिकाणी तब्बल आठ महिने वावरला. यादरम्यान त्याने असंख्य फायली हाताळल्या. मोठमोठे नेते, बिल्डर्स, कंत्राटदार यांच्या फायली पास करून दिल्या. इतकेच नाही तर त्याने राज्यातील आयएएस व आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांकडूनही अनेक कामे करवून घेतली. या निमित्याने त्याचा सह्याद्री, वर्षा, नंदनवन या शासकीय बंगल्यांमध्ये अगदी मुक्त संचार होता.इतके सारे तो अगदी राजरोसपणे करीत असल्यावरही त्याचेकडे मात्र कुणाचेच लक्ष गेले नाही. त्याला कधीच कुणी हटकले नाही. परंतु पापाचा घडा कधी ना कधी भरतोच. या नैसर्गिक न्यायाने तो अचानक हाती सापडला. सह्याद्री अतिथी गृहामध्ये एका महत्त्वपूर्ण शासकीय बैठकीदरम्यान मयूर ठाकरे अवाजवी धावपळ करीत होता. त्याचे हे खटकण्याजोगे वर्तन पाहून एका अधिकाऱ्याने त्याला हटकले. त्याची वास्तपुस्त केली. पण कामाच्या व्यापात आपण व्यग्र असल्याचा बहाणा करून त्याने वेळ मारून नेली. परंतु तेथे असलेल्या एका पत्रकाराची गरुड दृष्टी मात्र त्याचेवर होती.त्या पत्रकाराने त्या अधिकाऱ्याला मयूरबाबत विचारणा केली. त्यामुळे सतर्क होऊन त्या अधिकाऱ्याने मयूरला बोलाविले आणि त्याची पूर्ण झाडाझडती घेतली. त्याने मयूरचे पितळ उघड पडले. त्याने बनावट कागदपत्रे तयार करून आणि सरकारी यंत्रणेला फसवून हा सारा प्रताप केल्याचे निदर्शनास आले. ह्या प्रकाराने इतके दिवस ही बाब कुणाच्याच ध्यानात कशी आली नाही? ह्या प्रश्नाने सगळे अधिकारी चक्रावून गेले आहेत. मयूर ठाकरेंने तब्बल आठ महिने केलेल्या या तोतयेगिरीची माहिती बाहेर गेल्यास खुद्द मुख्यमंत्री तथा मुख्यमंत्री कार्यालयाची मोठीच नाचक्की होईल या भीतीने मुख्यमंत्री कार्यालयाकडून हा प्रकार जागीच दाबण्याचा असफल प्रयास केला जात आहे.

उल्लेखनीय आहे की, आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या पंढरपूर दौऱ्याचे वेळीही एका तोतयाने आपण मुख्यमंत्र्यांचे ओएसडी असल्याचे भासवून पोलीस अधिकाऱ्यांना कामास लावले होते. वास्तविक मुख्यमंत्री कार्यालयात एकूण १३ ओएसडी आहेत. त्यांच्या जबाबदाऱ्याही निश्चित करून दिलेल्या आहेत. मात्र मुख्यमंत्री कार्यालयाच्या ढिसाळ कारभारामुळे आता तिथे अनेक तोतये सुद्धा वावरू लागल्याचे आणि मुख्यमंत्री कार्यालयात तीन तेरा वाजवीत असल्याचे दिसत आहे. ही बाब राज्याचे हिताचे दृष्टीने अतिशय चिंताजनक आहे. ठाकरेला वेतन दिले नाही.
➖धीरज गुहाळ मुख्याधिकारी अचलपूर

अचलपूर नगरपालिकेचा मूळ कर्मचारी असणाऱ्या मयूर ठाकरे ह्याला अचलपूर नगरपालिकेने वेतन दिलेले नाही. असे अचलपूरचे मुख्याधिकारी धीरज गुहाळ यांनी सांगितले आहे. अचलपूर नगरपालिकेत मुख्याधिकारी पदावर कार्यरत झाल्यानंतर माझ्या कार्यकाळात मयूर ठाकरेचे वेतनशोधन आपण केले नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

आमदार बच्चू कडू म्हणतात – मयूरशी ९ महिन्यांपासून संबंध नाही.

मयूर ठाकरे हा माझ्यासोबत ओएसडी म्हणून होता.परंतू ९ महिन्यांपूर्वी सरकार बदलल्यावर त्याचेशी माझा कुठलाही संबंध आलेला नाही. त्याने अन्य कुणाच्यातरी वशिल्याने मंत्रालयात मुख्यमंत्र्यांकडे ओएसडी म्हणून काम मिळविल्याची माहिती होती. आता त्याने जो काही प्रकार केल्याचे बोलले जात आहे त्या संदर्भात मला कुठलीच माहिती नाही. असे अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी बोलताना स्पष्ट केले आहे.