केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाहनाला कंटेनरची धडक,साताऱ्याच्या वाईजवळ भीषण अपघात

0
10

सातारा–केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. रामदास आठवले यांच्या वाहनाला कंटेनरने धडक दिली. या अपघातात रामदास आठवले यांच्या गाडीचं मोठं नुकसान झालं आहे.

सुदैवाने रामदास आठवले या अपघातातून सुखरुप बचावले आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही. अपघातानंतर रामदास आठवले दुसऱ्या वाहनाने मुंबईच्या दिशेला रवाना झाले आहेत. साताऱ्यातील वाईजवळ ही अपघाताची घटना घडली आहे. रामदास आठवले वाईहून मुंबईच्या दिशेला येत होते. या दरम्यान एका कंटेनरने त्यांच्या गाडीला धडक दिली.

रामदास आठवले यांच्या वाहनाच्या अपघाताची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. रामदास आठवले सुखरुप आहेत ना? अपघाताची घटना नेमकी कशी झाली? रामदास आठवले आता कुठे आहेत? असे अनेक प्रश्न त्यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांच्या मनात उपस्थित होत आहेत. रामदास आठवले यांच्याकडून अद्याप तरी अधिकृतपणे अपघातानंतर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. कदाचित ते थोड्या वेळाने त्यांच्या अधिकृत फेसबुक किंवा ट्विटर अकाउंटवर याबाबत माहिती देतील. पण ते सुखरुप असल्याची माहिती मिळत आहे. काळजी करण्यासारखं काही नाही. रामदास आठवले मुंबईत आल्यानंतर कदाचित माध्यांशी संवाद साधतील तेव्हा अपघाताबद्दल सविस्तर माहिती देऊ शकतात.