एकाचवेळी वीस उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण

0
9

पीटीआय
नवी दिल्ली, दि. २२ – भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोने एकाचवेळी यशस्वीरित्या वीस उपग्रह प्रक्षेपित करुन नवा इतिहास रचला आहे. आंध्रप्रदेशातील श्राहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन सकाळी नऊवाजून २६ मिनिटांनी पीएसएलव्ही-सी ३४ या प्रक्षेपकाव्दारे प्रक्षेपण झाले.
पुण्यातील विद्यार्थ्यांनी बनविलेला उपग्रह झेपावला

या वीस उपग्रहांमध्ये १७ छोटे परदेशी उपग्रह आहेत. ७२७ किलो वजनाचा कारटोसॅट हा भारताचा मुख्य पृथ्वी निरीक्षण करणारा उपग्रह असून, तो पृथ्वीची छायाचित्रे पाठवणार आहे. दोन उपग्रह भारतीय शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांनी तयार केले आहेत.

यातील एक संस्था पुण्यातील आहे. पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या उपग्रहाला ‘स्वयंम’ असे नाव दिले आहे. दुसरा उपग्रह तामिळनाडूतील सत्यभामा विद्यापीठाने तयार केला आहे.

इस्त्रोने अवकाशात पाठवलेल्या उपग्रहांमध्ये कॅनडा, जर्मनी, इंडोनेशिया आणि अमेरिका या देशांचे छोटे उपग्रह आहेत. गुगलच्या टेरा बेला कंपनीचा ११० किलो वजनाचा एक उपग्रह आहे. जेन-२ असे या उपग्रहाचे नाव आहे. या वीस उपग्रहांचे एकूण वजन १२८८ किलो असून, अन्य अवकाश संशोधन संस्थांच्या तुलनेत इस्त्रोने १० पट कमी खर्चात हे प्रक्षेपण केले.

यापूर्वी एप्रिल २००८ मध्ये इस्त्रोने एकाचवेळी दहा उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले होते. एकाचवेळी सर्वाधिक यशस्वी उपग्रह प्रक्षेपित करण्याचा विश्व विक्रम सध्या रशियाच्या नावावर आहे. २०१४ मध्ये रशियाने एकाचवेळी ३७ उपग्रहांना यशस्वीरित्या कक्षेत स्थापित केले होते.