महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी सर्वच एक्झिट पोल्सनी संमिश्र असा अंदाज व्यक्त केला होता. त्याप्रमाणे आज निकालाच्या दिवशी चित्र दिसत आहे. सकाळच्या सत्रात महाराष्ट्रातील ४८ पैकी महायुती १८ तर महाविकास आघाडी २९ जागांवर पुढे असल्याचे दिसत आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत आहे. महायुतीमध्ये भाजपा 11, शिवसेना शिंदे गट 6, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 1 जागेवर आघाडीवर आहे. तर मविआमध्ये शिवसेना उबाठा १०, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ८ आणि काँग्रेस ११ जागांवर आघाडी घेऊन आहे.अपक्ष १ जागेवर आघाडीवर आहे.
मविआचे नाशिकचे उमेदवार राजाभाऊ वाजे, हातकंणगलेमध्ये सत्यजित आबा, शिरूरमध्ये डॉ. अमोल कोल्हे सांगलीमध्ये अपक्ष उमेदवार विशाल पाटील, साताऱ्यात शशिकांत शिंदे आघाडीवर असल्याचे दिसत आहेत.बारामतीमध्ये सुप्रिया सुळे,सोलापूरात प्रणिती शिंदे,गडचिरोली चिमूरमध्ये नामदेवराव किरसान हे कल सकाळच्या सत्रातील असले तरी दुपारपर्यंत यावर आणखी स्पष्टता येऊ शकते. मात्र भाजपाने ४५ जागा जिंकण्याचा दावा केला होता, त्या दाव्याला कुठेतरी छेद जात असल्याचे दिसत आहे.मुंबईत उबाठाचे अरविंद सावंत, अनिल देसाई पुढे आहेत. तर उत्तर पश्चिम लोकसभेत शिंदे गटाचे रवींद्र वायकर पुढे आहेत.
उर्वरीत महाराष्ट्रात सांगलीतील विशाल पाटील, दिंडोरी मतदारसंघात मविआचे भास्कर भगरे, चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार पिछाडीवर आहेत.चंद्रपूरचा निकाल २०१९ प्रमाणेच धक्कादायक असल्याचे म्हटले जाते. २०१९ सालीही याठिकाणी भाजपाच्या हंसराज अहिर यांचा पराभव झाला होता.
विदर्भात महायुती केवळ तीन जागांवर पुढे आहे. विदर्भ हा भाजपाचा गड मानला जातो. मात्र विदर्भात सकाळच्या सत्रात भाजपाला मोठा झटका मिळाला असल्याचे दिसत आहे.
सोलापूर लोकसभेत दुसऱ्या फेरीअखेर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आघाडीवर आहेत. त्यांनी भाजपाच्या राम सातपुते यांच्यावर १७ हजार ८९७ मतांची आघाडी घेतली आहे.
कोण किती जागा लढवत आहे?
महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत आहे. महायुतीमध्ये भाजपा २८, शिवसेना शिंदे गट १५, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ४ आणि रासप १ जागा लढवत आहे. तर मविआमध्ये शिवसेना उबाठा २१, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट १० आणि काँग्रेस १७ जागांवर लढत आहे.