सिंधुदुर्गातील मालवण राजकोट येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला..
मालवण :-नौदल दिनानिमित्त राजकोट येथे आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा आज मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे कोसळला.ही घटना दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान घडली. या घटनेची माहिती मिळताच शिवप्रेमींनी घटनास्थळी धाव घेतली.तर तहसीलदार, पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. तहसीलदार वर्षा झालटे यांनी या घटनेची माहिती नौदल विभागाला कळविण्यात आले असल्याचे सांगितले.
मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर मालवणातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय फोडण्यात आले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून कणकवलीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर तातडीने पोलीस बंदोबस्त पुरवण्यात आला आहे. त्यामुळे आता कणकवलीतील शिवसैनिकांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
४ डिसेंबर रोजी नौदल दिनानिमित्त नौदल विभागाच्या वतीने राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला होता. या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. हा पुतळा शिवप्रेमींसाठी आकर्षक ठरला होता.दरम्यान गेले दोन तीन दिवस किनारपट्टी भागात वादळी वारे व मुसळधार पाऊस सुरू आहे.यातच आज दुपारी वादळी वाऱ्यामुळे राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा पायातून तुटून कोसळला.स्थानिकांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी यांची माहिती प्रशासनास दिली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक शिवप्रेमींनी राजकोट येथे धाव घेतली. तहसीलदार वर्षा झालटे, नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे हेही पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.तर पुतळा कोसळल्याने शिवप्रेमी संतप्त बनले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांची जादा कुमक मागविण्यात आली आहे. पुतळ्याच्या ठिकाणी कोणालाही जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे
पंतप्रधानांनी उद्घाटन करण्यासाठी घाई गडबडीत उभारलेला पुतळा कोसळला!
संभाजीराजे यांनी ट्विट करत टीकास्त्र सोडलं आहे. संभाजीराजे यांनी म्हटलं आहे की, मुळातच आकारहीन व शिल्पशास्त्रास अनुसरून नसलेला व घाईगडबडीत उभारलेला हा पुतळा बदलावा म्हणून तेव्हाच आम्ही पंतप्रधानांकडे पत्र लिहून मागणी केली होती. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक वर्षभरात कोसळते यासारखी दुर्दैवी बाब कोणती नाही. अशा परिस्थितीत महाराजांच्या किल्ल्यांवर आपण कोणत्या अधिकाराने बोलणार! आता त्याठिकाणी पुन:श्च महाराजांचे उचित स्मारक उभारणे गरजेचेच आहे. पण निवडणुकीच्या आधी ते उभारण्याच्या इर्ष्येत परत काही गडबड करू नये. उशीर होऊदे पण शास्त्रोक्त पद्धतीने या स्मारकाची पुनर्बांधणी झाली पाहिजे.
‘कंत्राटदार सरकार’ला महाराजांचा एक भक्कम पुतळा उभारता आला नाही
विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड यांनीही सरकारवर हल्लाबोल केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी बांधलेले किल्ले अजूनही भक्कम आहेत आणि ‘कंत्राटदार सरकार’ला महाराजांचा एक भक्कम पुतळा उभारता आला नाही, हा यांच्या कारभाराचा हिशेब आहे. “महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या महाराजांचा पुतळा नेमका कुणाच्या मार्गदर्शनाखाली तयार केला गेलाय? हा पुतळा उभा आणि हातात म्यानातून उपसलेसी तलवार असलेलाच का आहे? कुणालाच या पुतळ्यामध्ये काहीच चुकीचं वाटत नाही का?” हे सर्व प्रश्न मी उद्घाटनानंतर उपस्थित केले होते. आज महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर त्या दिखावेगिरीचा पर्दाफाश झालाय. महाराज आम्हाला माफ करा.