एका नक्षल्यास अटक, तिघांचे आत्मसमर्पण

0
12
गडचिरोली,  दि..१७: अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला कसनसूर अॅक्शन टीमचा कमांडर तथा एलओएस सदस्यास पोलिसांनी काल(ता.१६) अटक केली. रानू पांडू उसेंडी रा.जवेली असे अटक केलेल्या नक्षलवाद्याचे नाव असून, त्याच्यावर दोन लाख रुपयांचे बक्षिस होते.लपून-छपून कुटुंबीयांच्या भेटीला येण्यापेक्षा नक्षल चळवळ सोडून सन्मानाने मुख्य प्रवाहात सामील व्हावे, असे आवाहन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी केले आहे.
छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेल्या जवेली गावपरिसरात आयोजित एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी रानू गावात आला होता. याबाबतची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली. कसनसूर येथील नक्षलवाद्यांच्या स्थानिक पातळीवरील (एलओएस) संघटनेचा सक्रीय सदस्य असलेला रानू उसेंडी २००५ पासून नक्षल दलममध्ये कार्यरत होता. २००९ मध्ये उपपोलिस स्टेशन कसनसूर येथे शस्त्र जप्तीच्या गुन्ह्यासह खून, जाळपोळ, पोलिसांवर हल्ले, ग्रामपंचायत जाळपोळ, चकमकी, काळे झेंडे लावणे अशा अनेक गुन्ह्यांमध्ये त्याचा सक्रीय सहभाग होता. जिल्ह्यातील जारावंडी, कसनसूर क्षेत्र अति नक्षलग्रस्त असून गावात सशस्त्र नक्षल संघटन, जनमिलीशिया, एरिया रक्षक दल (एआरडी), ग्राम रक्षक दल (जीआरडी) कार्यरत आहेत. रानू उसेंडीच्या अटकेने या भागात जिल्हा पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. दरम्यान उसेंडीला आज न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दुसरीकडे आज तीन नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. कान्हू उर्फ माहू सुकलू उसेंडी(२५)रा.पुन्नूर ता.एटापल्ली, सुर्या उर्फ अंकुश समुराम घसेन नरोटे(२१)रा.मोरचूल ता.धानोरा व रामजी पांडू कवडो(२४)रा.पुसकोठी ता.एटापल्ली अशी आत्मसमर्पितांची नावे आहेत.कान्हू उसेंडी हा कसनसूर एलओएसचा सदस्य होता. २००५ मध्ये दलममध्ये भरती झालेला कान्हू २०१० पर्यंत कसनसूर दलमचा सदस्य होता. त्यानंतर टेक्नीकल टीममध्ये त्याचा समावेश करण्यात आला. २०१३ मध्ये तो कंपनी क्रमांक १० चा सेक्शन उपकमांडर होता. सुर्या उर्फ अंकुश नरोटे हा दंडकारण्य डॉक्टर टीमचा सदस्य होता. ४ जुलै २०१० रोजी टिपागड दलममध्ये भरती झाल्यानंतर सप्टेंबर महिन्यात त्याची अबुझमाड एरियात बदली करण्यात आली. डिसेंबर २०११ मध्ये बीसीटीएस मध्ये तो सदस्य होता. २०१२ मध्ये त्याला उपकमांडरपदी बढती देण्यात आली. रामजी कवडो हा गट्टा एलओएसचा सदस्य होता. २००९ ते २०१३ पर्यंत तो या पदावर कार्यरत होता. एकाच दिवशी जहाल नक्षलवाद्यास अटक आणि तीन नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याने गडचिरोली पोलिसांचे मनोबल उंचावले आहे. आत्मसमर्पण योजना सुरु झाल्यापासून मागील ११ वर्षांत आतापर्यंत ५६४ जणांनी आत्मसमर्पणाचा मार्ग स्वीकारला आहे. आत्मसमर्पितांना शासनाच्यावतीने रोख रक्कम, घरकुल किंवा भुखंड, रोजगाराभिमुख प्रशिक्षण, वाहतूक परवाना, अर्थसाहाय्य आदी बाबीं दिल्या जातात. त्यामुळेच गत तीन-चार वर्षांत आत्मसमर्पणाकडे नक्षलवाद्यांचा कल वाढला आहे, असे पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. ज्यांनी केवळ बंदुकीची भाषा केली त्यांना पोलिसांनी यमसदनी पाठविले आहे. पोलिसांसोबत झालेल्या आतापर्यंतच्या चकमकीत १७२ नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले आहे.