मुंबई/वृत्तसेवा—मुंबईमध्ये 79 नगरसेवकांच्या निवडी विरोधात न्यायालयात निवडणूक याचिका दाखल झाल्या आहेत. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. 79 नगरसेवकांच्या निवडीविरोधात न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करण्यात आल्याचे उघड झाले आहे. मुंबईतील या प्रकरणांपैकी अनेक याचिका सध्या न्यायप्रविष्ट असून काही प्रकरणांवर सुनावणी सुरू आहे.
मुंबई महापालिका निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. माहिती माहिती अधिकार कायद्यान्वये आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना मुंबई महानगरपालिकेच्या विधी खात्याकडून देण्यात आली आहे. गलगली यांनी निवडणुकीनंतर विविध प्रभागांमध्ये दाखल झालेल्या निवडणूक याचिकांची माहिती मागवली होती. त्यानंतर पालिकेच्या विधी खात्याने अधिकृत माहिती उपलब्ध करून दिली. उपलब्ध माहितीनुसार, प्रभाग 119 एस मधील मोहम्मद अन्वर अब्दुल्ला शेख यांनी शिवसेनेचे नगरसेवक राजेश सोनावळे आणि इतर उमेदवारांविरोधात दाखल केलेली निवडणूक याचिका लघुन्यायालयाने फेटाळून लावली आहे.
मात्र अनेक प्रकरणांमध्ये अद्याप सुनावणी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. न्यायालयात आव्हान देण्यात आलेल्या नगरसेवकांमध्ये विविध राजकीय पक्षांच्या नगरसेवकांचा समावेश न्यायालयात आव्हान देण्यात आलेल्या नगरसेवकांमध्ये विविध पक्षांच्या आणि विविध प्रभागांतील नगरसेवकांचा समावेश आहे. यामध्ये अनेक महत्त्वाच्या प्रभागांतील निवडून आलेल्या सदस्यांचा समावेश आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार, मतमोजणीतील आक्षेप, उमेदवारी अर्जांबाबतचे वाद तसेच निवडणूक नियमांचे उल्लंघन अशा विविध मुद्द्यांवरून या याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
इतक्या मोठ्या संख्येने निवडणूक याचिका दाखल झाल्याने आगामी काळात न्यायालयीन निर्णयांचा मुंबई महापालिकेच्या राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेत जास्त जागा मिळवत मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. परंतु आता मुंबई महापालिकेतील 79 नगरसेवकांच्या निवडीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे.





