पालघर=पालघर जिल्हा परिषदेच्या भरती प्रक्रियेत बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी मिळवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील जिल्हा परिषद भरतीत बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नौकरी मिळवल्याप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली. रुपाली तुषार ठेंगळे असे या तरूणीचे नाव असून ती पुणे जिल्हयातील रहीवासी आहे. पालघर पोलिसांनी तिला अटक केली आहे. या घटनेमुळे जिल्हा परिषद भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील रूपाली तुषार टेंगले यांनी प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी दिव्यांग प्रवर्गातून अर्ज करत श्रवणदोष असल्याचे प्रमाणपत्र सादर केले होते. यानंतर निवड होऊन रूपालीची डहाणू तालुक्यातील चिंचणी प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्ती करण्यात आली. सुरुवातीला धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकडून हे प्रमाणपत्र वैध असल्याचे कळविण्यात आले होते. मात्र हे प्रमाणपत्र बनावट असल्याचा संशय निर्माण झाल्यानंतर पडताळणी करण्यात आली. पडताळणीत प्रमाणपत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तिची सेवा समाप्त करण्यात आली.
याप्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात फसवणूक, बोगस कागदपत्र तयार करणे आणि सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खोटी माहिती सादर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी रूपाली ठेंगळे या तरूणीला अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तिला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.आता पोलिसांकडून बनावट प्रमाणपत्र नेमके कुठून तयार करण्यात आले, यात आणखी कोणी सहभागी आहे का, प्रमाणपत्र तयार करण्यात कोणत्या रॅकेटचा हात आहे का, याचा तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे जिल्हा परिषद भरती प्रक्रियेतील कागदपत्र पडताळणी यंत्रणेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.





