पाटणा-इंदोर एक्स्प्रेसला अपघात, ६३ ठार

0
8

वृत्तसंस्था कानपूर, दि. 20 – पाटणा-इंदोर एक्स्प्रेसचे १४ डबे रुळावरुन घसरुन झालेल्या भीषण अपघातात ६३ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या भीषण अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत. जखमीमधील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. या अपघातातील मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाटण्याहून इंदोरला जाणा-या इंदोर-राजेंद्रनगर एक्स्प्रेसचा अपघात आज पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास झाला. कानपूरमधील पुखरायान रेल्वे स्टेशनजवळ हा अपघात झाला. या अपघातात आत्तापर्यंत ६३ जणांचा मृत्यू झाल्याचे समजते, तर अनेक जण जखमी झाले आहेत. रेल्वे पटरी उखडल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

दरम्यान, अपघाताचे वृत्त समजताच घटनास्थळी पोलीस आणि प्रशासनाकडून तात्काळ बचावकार्याला सुरुवात झाली आहे. तसेच मेडिकलची टीम सुद्धा दाखल झाली आहे. अपघातानंतर त्या मार्गावरील इतर ट्रेनचा मार्ग वळवण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव जातीने या दुर्घटनेची माहिती घेत असून केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी संबंधित अधिकाऱ्यांना घटनेची माहिती घेण्याचे आदेश दिले आहेत.