नव्या पुलासाठी वापरणार जुन्या पुलाचा मलबा

0
8

नागपूर दि.20: छत्रपती चौकातील उड्डाण पूल तोडला जात असला तरी याच उड्डाण पुलाच्या मलब्याचा वापर मेट्रो रेल्वेसाठी प्रस्तावित नवीन पुलाच्या बांधकामात होणार आहे. खापरी भागात मेट्रोचे कार्य सुरू आहे. त्यातील कॉलमच्या सभोवतालचा खड्डा भरण्यासाठी काँक्रीटमध्ये या मलब्याचा उपयोग केला जाणार आहे. जुन्या पुलाचे काँक्रीट मजबूत असल्याने त्याची उपयोगिता अजूनही कायम आहे.

पूल तोडण्याचे काम सुरू होऊन आता पाच दिवस झाले आहेत. या दरम्यान ७५ टक्के पूल भुईसपाट झाला आहे. शनिवारी साई मंदिर ते छत्रपती चौकापर्यंतची भिंत पाडण्यात आली. दुसऱ्या बाजूने ही भिंत पाडणे अजून बाकी आहे.

परंतु यातील माती काढण्यात आली आहे. या मातीचा उपयोगही नवीन पुलाच्या बांधकामात केला जाणार आहे. हा पूल पूर्णपणे तोडण्यासाठी १५ दिवसांचा अवधी मागण्यात आला आहे. परंतु पाच दिवसांमध्ये ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. मशीनचा वापर जास्त होत असल्याने काम वेगाने होत आहे. बहुसंख्य कर्मचारी लोखंड उचलणे व मलबा लोडिंगचे कार्य करीत आहेत.