महसूल मंत्री एकनाथ खडसेंच्या पुतण्याचा कोट्यवधीचा घोटाळा

0
18

अकोला: अकोला जिल्ह्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासकामांमध्ये तब्बल 1 कोटी 44 लाखांचा गैरव्यवहार झाला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे या कामासाठी तांत्रिक सेवा पुरविण्याचे कंत्राट राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा भाऊ आणि पुतण्याची मालकी असलेल्या कंपनीला देण्यात आले आहे. अकोला येथील मेसर्स के.जी.खडसे अँड असोसिएट्स’ असं या फर्मचं नाव आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासकामातील पैशाला काम पूर्ण न होताच पाय फुटल्याने बाजार समितीतील कामे निकृष्ठ दर्जाची झाली आहेत. विशेष म्हणजे यातील ८० लाखांची कामे तर फक्त कागदावरच पूर्ण झाली आहेत.

या कामांमधील गैरव्यवहार अमरावती येथील ‘शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय’ या त्रयस्त संस्थेच्या ‘पाहणी अहवालातून’ स्पष्ट झाला आहे. या गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात बाजार समितीचे सचिव राजकुमार माळवे या तरुण अधिकाऱ्याने दंड संबंधिताविरूद्ध थोपटले आहेत. परंतु, राजकीय आणि अधिकारी त्यांच्यावर तोंड बंद ठेवण्यासाठी दबाव आणत असल्याचंही समोर येत आहे.

यासंदर्भातील फौजदारी तक्रार घेण्यासाठी गेल्या चार दिवसांपासून अकोट पोलिस टाळाटाळ करत आहेत. दरम्यान, आपल्या ‘फर्म’ने कोणताच गैरव्यवहार केला नसल्याचा दावा हरीश खडसे यांनी केला आहे.

अकोला जिल्ह्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समिती ही सध्या चर्चेत आली आहे ती तेथील विकासकामांमध्ये झालेल्या गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांनी. 2011 साली बाजार समितीने 2 कोटी 97 लाखांच्या कामांच्या निविदा मागविल्या होत्या. या कामांमध्ये अंतर्गत रस्ते, कम्पाऊंड वॉल, टीनशेड, कार्यालय नुतनीकरण अशा अनेक कामांचा समावेश होता. ‘महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ’ राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांकडून शेतमालावर मिळणाऱ्या ‘सेस फंडा’तून विकासकामे करीत असते. अशी कामे करण्यासाठी ‘पणन मंडळ’ राज्यातून काही आर्किटेक्टची निवड करून त्यांचे पॅनल तयार करते.

बाजार समितीने मंजूर केलेली कामे कंत्राटदाराकडून करून घेण्याची आणि त्याच्या गुणवत्तेची जबाबदारी याच अधिकृत आर्किटेक्टवर असते. या नियमानुसार अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीतील विकासकामांचे कंत्राट अकोल्यातील ‘मेसर्स के.जी.खडसे अँड असोसिएट्स’ या खाजगी फर्मला देण्यात आले. ही फर्म राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा भाऊ आणि पुतण्याच्या मालकीची आहे. यामध्ये सुनीलकुमार अग्रवाल या कंत्राटदाराकडून कामे करून घेणे आणि त्याची गुणवत्ता तपासणे याची जबाबदारी खडसे यांच्यावर होती. मात्र, खडसे यांनी कंत्राटदाराला हाताशी धरून 2.97 कोटींच्या कामांपैकी तब्बल 1.44 कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप बाजार समितीचे सचिव राजकुमार माळवे यांनी केला आहे.

या झालेल्या कामांचे तांत्रिक सर्वेक्षण करण्यासाठी अमरावतीच्या ‘शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय’ या संस्थेची निवड करण्यात आली होती. या सर्वेक्षणातून यामध्ये तब्बल 1.44 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट कारण्यात आले. विशेष म्हणजे यातील 80 लाखांची कामे फक्त कागदोपत्री झाल्याचे उघड झाले आहे. तर 64 लाखांची कामे अतिशय निकृष्ट दर्जाची असल्याचंही अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.

या अहवालानंतर बाजार समितीचे सचिव राजकुमार माळवे यांनी यातील दोषींवर कारवाई करण्याच्या दृष्टीने मोहीम उघडली आहे. यासंदर्भात त्यांनी आपल्या खात्यातील वरिष्ठांना याची कल्पना देत पत्रव्यवहार केला आहे. चार दिवसांपासून अकोट पोलिसांनी यासंदर्भात तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या माळवे यांची तक्रार घेण्यासाठी टाळाटाळ चालवली आहे.

अकोट पोलिसांवर याप्रकरणी मोठा राजकीय दबाव असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ‘मेसर्स के.जी.खडसे अँड असोसिएट्स’ या फर्मकडे राज्यातील अनेक बाजार समित्यांमधील जवळपास 350 कोटींची कामे असल्याची माहिती मिळत आहे. या कामांचीही चौकशी झाल्यास राज्यातील बाजार समित्यांच्या अंतर्गत विकासकामांमध्ये झालेला मोठा घोटाळा बाहेर येण्याची शक्यता राजकुमार माळवे यांनी व्यक्त केलीय.

अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामांसंदर्भात त्रयस्त तांत्रिक लेखा परीक्षणातील निरीक्षणे-

बरीच कामे निविदेतील व करारनाम्याप्रमाणे केलेली नसुन बऱ्याच कामाच्या मोजणी पुस्तकातील नोंदी ह्या वास्तविक जागेवर केलेल्या कामाच्या नोंदी पेक्षा भिन्न आणि कमी मापाचे व कमी प्रतीच्या आढळल्या.
आँक्शन शेड गोडाउन बांधकामात 74 हजार 116 रुपयांचा अपहार केल्याचंही स्पष्ट झालं आहे.
सी. सी पार्कीग, मार्केट यार्डमधील मेन गेटच्या कामांत 36 लाख 67 हजार 571 रूपयांचा अपहार झाल्याचंही स्पष्ट झालं आहे.
बि.टी रोड, मेन मार्केट ह्या कामात 22 लाख 86 हजार 337 रूपयांचा अपहार झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
चोहोट्टा बाजार येथील आँक्शन शेडचे काम निकृष्ट असून यामध्ये 9 लाख 56 हजार 046 रुपयांचा अपहार झाला असल्याचंही या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान, ‘मेसर्स के.जी.खडसे अँड असोसिएट्स’ने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. 1980 सालापासून अमरावती विभागातील अनेक बाजार समित्यांना तांत्रिक सेवा पुरविण्याचे काम या फर्मकडे आहे. सध्या अमरावती विभागातील बाजार समित्यांसह राज्यातील इतर भागातील अनेक बाजार समित्यांना तांत्रिक सेवा पुरविण्याचे कंत्राट या फर्मकडे आहे.

राज्यातील बाजार समित्यांमधील भयानक वास्तव-

संपूर्ण महाराष्ट्रात 300 बाजारसमित्यांसाठी फक्त 12 आर्किटेक्ट ( प्रत्यक्षात किमान 150 आर्किटेक्टची गरज आहे)
– आघाडी सरकारच्या काळात बाजार समित्यांवर साडेचार हजार कोटींची कामं करण्याची घोषणा केली होती. निवडणुका जाहीर झाल्यावर दोनच दिवसात 50 कोटींची काम मंजूर करुन घेतली.
– राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये झालेल्या विकास कामांचे त्रयस्त तांत्रिक संस्थेद्वारे परीक्षण केल्यास राज्यातील एका मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे.

अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीची सत्ता आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांत आर्किटेक्ट आणि कंत्राटदाराने चालवलेल्या लुटीचा संचालक मंडळाला पत्ता नव्हता का? असा प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सत्तेने राज्यातील भाजपच्या एका बड्या मंत्र्याच्या नातेवाईकांना वाचविण्यासाठी अकोट बाजार समितीमधील हा ‘मैत्री’चा नवा पैटर्न नक्कीच नवा आहे. त्यामुळेच अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमधील या गैरव्यवहाराचे प्रकरण सध्या सुरु असलेल्या लुटीतील ‘हिमनगाचे टोक’ म्हणता येईल.