खडसे गुलाबराव पाटील यांच्या विरुद्ध करणार अब्रुनुकसानीचा दावा

0
23

जळगाव, दि. 4 – माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी जिल्हा बँकेतून नोटाबंदीच्या काळात १५० कोटींच्या नोटा बदलल्याच्या सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या कथीत आरोपावरून एकनाथराव खडसे हे अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. या बाबत खडसे यांनी शनिवारी रात्री आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. या वेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष किशोर पाटील उपस्थित होते.पुरावे असतील तर गुलाबरावांनी स्वत: चौकशी करावी खडसे म्हणाले, गुलाबराव पाटील यांनी माझ्यासह जिल्हा बँकेच्या चेअरमन यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले. पुरावे असतील तर त्यांनी स्वत: चौकशी करावी. ते राज्य मंत्रीमंडळातील सदस्य आहे. त्यांना चौकशीचा अधिकार आहे.
गुलाबराव यांनी आरोप करून जिल्हा बँकेला बदनाम केले आहे. त्यांच्यावर ४२० चा गुन्हा दाखल आहे. ४२० च्या प्रकरणातून जेलमधून बाहेर आल्यानंतर गुलाबराव राज्यमंत्रीमंडळात राज्यमंत्री झाले. गुलाबराव हेच ‘फ्रॉड’ आहेत. धरणगावात १०० कोटींवर बोगस टिश्यू रोपांचे कर्ज दिल्याची चौकशी दडपण्यासाठी गुलाबराव यांनी प्रयत्न केले. त्यांनी जिल्हा बँकेची दिशाभूल करून आपल्या जमिनीवर टिश्यूचे कर्ज घेतले. त्याच जमिनीवर गारपीटीचे अनुदान घेतले. नंतर त्याच जमिनीवर दुष्काळाचे अनुदान घेतले. एक कोटी रुपये त्यांनी बोगस कर्जप्रकरणात हडप केले. तसा अहवाल आला आहे, असेही खडसे म्हणाले.