नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 26 जवान शहीद;7 जखमी

0
14
रायपूर/गोंदिया(berartimes.com), दि. 24 – छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत सीआरपीएफचे 26 जवान शहीद झाले आहेत. नक्षलवाद्यांनी केलेल्या या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांनी तात्काळ बैठक बोलावली आहे. तर, बस्तरचे पोलीस महानिरीक्षक विकेकानंद सिन्हा आणि पोलीस उपमहानिरीक्षक सुंदरराज सुकमाकडे रवाना झाले आहेत. केंद्रीय गृहराज्यमंत्री हसंराज अहीर हे सुध्दा रायपूरकडे रवाना झाले आहेत.तसेच हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील गडचिरोली-गोंदिया सीमावर्ती भागांत हायअलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुकमा जिल्ह्यात काला पठारजवळ चिंतागुफा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) 74 बटालियनचे जवान आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत सीआरपीएफचे 26 जवान शहीद झाले असून सात जण जखमी झाले आहेत. दरम्यान, जखमी झालेल्या जवानांना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून रायपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सीआरपीएफच्या कॅम्पजवळ जादा जवानांचा फौजफाटा वाढविण्यात आला आहे. तसेच, जवानांचे रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. याच सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात यापूर्वी 11 मार्च रोजी सीआरपीएफचे 12 जवान शहीद झाले होते.
आज दुपारी दीडच्या सुमारास नक्षलवाद्यांनी ‘सीआरपीएफ’च्या तुकडीवर हल्ला केला. हा हल्ला ‘सीआरपीएफ’च्या 74 व्या बटालियनवर झाला आहे. येथील नक्षलग्रस्त भागातील रस्ते निर्माणाच्या कार्याच्या सुरक्षेसाठी ही बटालियन तैनात आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांनी एलईडीचा स्फोट घडवून आणला. त्यानंतर नक्षलवाद्यांनी गोळीबारही केला. ‘सीआरपीएफ’च्या जवानांनी या गोळीबारास प्रत्युत्तर दिले. दोरनापाल आणि जगरगुंडा मार्गावर दुपारी एकच्या सुमारास सीआरपीएफच्या 74 व्या बटालियनचे जवान जेवण करत होते. याचवेळी नक्षलवाद्यांनी अचानक हल्ला केला. त्यांनतर दोन्हीकडून जोरदार चकमक उडाली. मृत्यूमुखी पडलेले सर्व जवान एकाच बटालियनचे होते.
जखमींची नावे
1. सहाय्यक उपनिरीक्षक आर.पी. हेमबराम
2. हेड कॉन्सटेबल राम मेहर
3. कॉन्सटेबल स्वरूप कुमार
4. कॉन्सटेबल मोहिंदर सिंग
5. कॉन्सटेबल जीतेंद्र कुमार
6. कॉन्सटेबल शेर मोहम्मद
7. कॉन्सटेबल लटू ओराओन
 वरीलपैकी क्रमांक 1 पासून 5 पर्यंतच्या जवानांची परिस्थिती गंभीर असून त्यांना हेलिकॉप्टरने रायपूरच्या रुगणालयात हलवण्यात आले आहे. तर, उर्वरीत दोन जणांची प्रकृती स्थीर आहे.
आधी नक्षलवाद्यांनी आमचा ठावठिकाणा शोधण्यासाठी गावकऱ्यांना पाठविले. त्यानंतर जवळपास 300 नक्षलवाद्यांनी आमच्यावर हल्ला केला. आम्हीही गोळीबार केला आणि त्यांचे भरपूर जण ठार मारले. मी तीन-चार नक्षलवाद्यांच्या छातीत गोळ्या घातल्या. – शेर महंमद, नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात जखमी झालेला ‘सीआरपीएफ’चा जवान