सालेम, डोसासह सहा जण दोषी

0
6

मुंबई ,दि.१७ : देशाला हादरवून सोडणाऱ्या मुंबईतील १९९३च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी कुख्यात गुन्हेगार अबू सालेम आणि मुस्तफा डोसासह सहा जणांना विशेष टाडा न्यायालयाने शुक्रवारी दोषी ठरवले. अब्दुल कय्युम याची सबळ पुराव्याअभावी सुटका केली. त्यांना देशाविरुद्ध युद्ध छेडल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यास न्यायालयाने नकार दिला. या सर्वांनी बाबरी मशीद पाडल्याचा सूड घेण्यासाठी, तसेच काही नेत्यांना व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी बॉम्बस्फोटाचा कट रचला व अंमलात आणल्याचे निरीक्षण विशेष न्यायालयाने नोंदवले.

तब्बल २४ वर्षांनंतर मुंबई बॉम्बस्फोट खटल्याच्या ‘केस बी’चा निकाल विशेष टाडा न्यायालयाने दिला. पोर्तुगालवरून प्रत्यार्पण करून आणलेल्या अबू सालेमसह मुस्तफा डोसा, ताहीर मर्चंट, फिरोज रशीद खान, करीमुल्ला शेख यांना बॉम्बस्फोटाचा कट रचल्याप्रकरणी, टाडा, तसेच भारतीय दंडसंहितेच्या वेगवेगळ्या कलमांखाली, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल व शस्त्रास्त्रे कायद्यांतर्गत विशेष न्यायालयाचे न्या. जी. ए. सानप यांनी दोषी ठरविले, तर रियाझ सिद्दिकीला केवळ टाडाअंतर्गत दोषी ठरवले. आरोप सिद्ध करण्यात सरकारी वकील अपयशी ठरले, असे म्हणत, न्या. सानप यांनी अब्दुल कय्युमची सुटका केली.

मुस्तफा डोसा, ताहीर मर्चंट, फिरोज खान, करीमुल्ला शेख यांना फाशीची शिक्षा होण्याची शक्यता आहे. अबू सालेमला पोर्तुगालमधून भारतात आणताना सरकारने त्याला फाशी देणार नाही, असे आश्वासन दिल्याने सालेमला जन्मठेपेची शिक्षा दिली जाऊ शकते. त्याच्याबरोबर रियाझ सिद्दिकीलाही जन्मठेप होऊ शकते. या सर्व आरोपींची शिक्षा निश्चित करण्यापूर्वी सरकारी वकील व बचाव पक्षाच्या वकिलांना युक्तिवाद करण्यासाठी सोमवारी तारीख देण्यात येईल.