५ जहाल नक्षल्यांचे गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण

0
7

गडचिरोली,दि.८: सहा लाखांचा बक्षीस असलेल्या एरिया कमिटी सदस्यासह एकूण १६ लाखांचे बक्षीस असलेल्या ५ जहाल नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे.त्यामध्ये
जग्गू उर्फ जयराम कोमटी गावडे, रासो उर्फ देवे झुरु पुंगाटी, सुशीला उर्फ सन्नी बुरकू पुंगाटी, रैजी उर्फ भारत उर्फ कोरसा उर्फ अनिल बुधू गावडे व कमलेश लच्छू तेलामी अशी आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांची नावे आहेत. जग्गू उर्फ जयराम कोमटी गावडे हा प्लाटून क्रमांक १४ चा एसीएम सदस्य म्हणून कार्यरत होता. २००७ मध्ये तो भामरागड दलममध्ये भरती झाला. त्यानंतर भामरागड मिलीशिया कमांडर व प्लाटून क्रमांक १४ चा एसीएम सदस्य झाला. बेजूरपल्ली, येर्रागुडा, तोंडेर येथील चकमकी, लाकडी बिटांची जाळपोळ, खून अशा १७ गंभीर गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याच्यावर ६ लाखांचे बक्षीस होते.
रासो उर्फ देवे झुरु पुंगाटी ही प्लाटून क्रमांक १४ ची सदस्य म्हणून कार्यरत होती. तिच्यावर ४ लाखांचे बक्षीस होते. २००९ मध्ये ती भामरागड एलओएसमध्ये भरती झाली. मलमपोडूर, नेंडेर, नारगुंडा, आशा इत्यादी ठिकाणच्या चकमकी, येडमपल्ली येथील इसमाचा खून इत्यादी गुन्ह्यांत तिचा सहभाग होता. सुशीला उर्फ सन्नी बुरकू पुंगाटी ही मास टीम सदस्य म्हणून कार्यरत होती. तिच्यावर २ लाखांचे बक्षीस होते. २००६ मध्ये ती बासागुडा दलममध्ये भरती झाली होती. रैजी उर्फ भारत उर्फ कोरसा उर्फ अनिल बुधू गावडे हा मास टीम सदस्य म्हणून कार्यरत होता. त्याच्यावर २ लाखांचे बक्षीस होते. २००३ मध्ये तो कसनसूर एलओएसमध्ये भरती झाला. कोटमी, मेंढरी येथील चकमकी, बॅनर व पत्रके टाकणे इत्यादी गुन्ह्यांमध्ये तो सहभागी होता.
कमलेश लच्छू तेलामी हा भामरागड दलम सदस्य म्हणून कार्यरत होता. २०१२ मध्ये तो भामरागड दलममध्ये भरती झाला. विविध चकमकी व खुनाच्या गुन्ह्यांत त्याचा सहभाग होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याच्यावरही २ लाख रुपयांचे बक्षीस होते.
रैजी उर्फ भारत गावडे हा सुशीला उर्फ सन्नी बुरकू पुंगाटी हिचा पती आहे. शिवाय जग्गू उर्फ जयराम कोमटी गावडे व रासो उर्फ देवे झुरु पुंगाटी हेदेखील पती-पत्नी आहेत. २०१७ मध्ये आतापर्यंत १६ नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे. पोलिस दलाने आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षल्यांना भूखंड, आर्थिक मदत, रोजगार तसेच नसबंदी रिओपनिंग यासारख्या सुविधांच्या माध्यमातून त्यांचे पुनर्वसन घडवून आणल्याने अन्य नक्षली आत्मसमर्पण करीत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.