बीफ बाळगल्याच्या संशयावरून तरूणाला मारहाण

0
15

नागपूर, दि. 13- बीफ बाळगल्याच्या संशयावरून तरूणांना अज्ञातांकडून होणाऱ्या मारहाणीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होते आहे. बुधवारी नागपूरमध्ये बीफ बाळगल्याच्या संशयावरून एका व्यक्तीला काही अज्ञान व्यक्तींच्या जमावाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. नागपुरमधील भारसिंगी भागात ही घटना घडली आहे. या मारहाण प्रकरणी नागपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौघांना रात्री उशिरा चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर त्यां चौघांना गुरूवारी सकाळी अटक करण्यात आली आहे. मोरेश्वर तांदूळकर, जगदीश चौधरी, अश्विन उईके, रामेश्वर तायवाडे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने या मारहाणीचा व्हिडीओ जारी केला आहे. मारहाण झालेला व्यक्ती हा विक्रेता असल्याची माहिती मिळते आहे.पीडित व्यक्तीच्या घरी कार्यक्रम असल्याने दुसऱ्याच जनावराचे मांस घेऊन तो घरी चालाल होता. पण त्याच्याकडे असलेले मांस हे गोमांस असल्याच्या संशयाने काही अज्ञातांच्या जमावाने त्याला हटकले आणि मारहाण करायला सुरूवात केली. विक्रेत्याला झालेली अमानूष मारहाण व्हिडीओमध्ये अगदी स्पष्टपणे दिसते आहे.