बावनथडी व गोसेखुर्द प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण होणार

0
17

भंडारा दि.१३: प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत देशातील ९९ प्रकल्पांचा समावेश असून भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द व बावनथडी प्रकल्प या योजनेत समाविष्ट आहेत. बावनथडी प्रकल्पाचे काम ९७ टक्के पूर्ण झाले असून नोव्हेंबर २०१७ अखेर हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. गोसेखुर्द प्रकल्प २०१९-२० पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती केंद्रीय जलसंसाधन व नदी विकास राज्यमंत्री संजीवकुमार बलियान यांनी दिली.
यावेळी ना.बलियान यांनी बावनथडी व गोसेखुर्द प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. बावनथडी प्रकल्पाचे काम ९७ टक्के पूर्ण झाले असून उर्वरित तीन टक्के काम नोव्हेंबर २०१७ अखेर पूर्ण करणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. केंद्र सरकारने देशातील ९९ प्रकल्पांचा समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत केला आहे. यात महाराष्ट्र राज्यातील २६ प्रकल्पांचा समावेश आहे. यातील सात प्रकल्पांना प्राधान्यक्रम देण्यात आला असून त्यामध्ये बावनथडी, गोसेखुर्द प्रकल्पाचा समावेश आहे.बावनथडी प्रकल्प आंतरराज्यीय प्रकल्प असून मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांना लाभ होणार आहे. या प्रकल्पाची सिंचन क्षमता महाराष्ट्रात १७ हजार ५३७ हेक्टर तर मध्यप्रदेशात १८ हजार ६१५ हेक्टर एवढी आहे. या प्रकल्पाचा समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत करण्यात आल्यामुळे प्रकल्पाला निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही ना.बलियान यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेची प्रशंसा करून उत्तरप्रदेशमध्ये याच धर्तीवर ‘तलाव विकास योजना’ सुरू करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. माजी मालगुजारी तलाव व इतर मोठे तलाव याबाबत केंद्र सरकार गणना करून धोरण ठरविण्याच्या दिशेने पावले उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी खासदार नाना पटोले, आमदार चरण वाघमारे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे, गोसेखुर्दचे मुख्य अभियंता कांबळे, अधीक्षक अभियंता गवळी, सोनटक्के, चोपडे, कार्यकारी अभियंता ए.एस. गेडाम यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

मंत्र्यांकडून नाना पटोलेंची प्रशंसा
केंद्रीय राज्यमंत्री संजीवकुमार बलियान यांनी खासदार नाना पटोले यांची मुक्तकंठाने प्रशंसा करीत म्हणाले, नाना पटोले हे केवळ खासदारच नाही तर ते शेतकरी नेतेसुद्धा आहेत. उत्तरप्रदेशात त्यांना शेतकरी नेते म्हणूनच ओळखले जाते. आपल्या क्षेत्रातील प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी त्यांचा आवर्जून प्रयत्न असतो. बावनथडी व गोसेखुर्द प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. नागपूरच्या नाग नदीच्या पाण्यामुळे वैनगंगा व गोसेखुर्द प्रदूषणाची त्यांनी सांगितलेली समस्या नोट केली असून त्यावर कार्यवाही सुनिश्चित करण्याचे काम राज्य सरकारचे असल्याचे सांगितले.