उत्तर प्रदेशात कैफियत एक्स्प्रेसने डंपरला उडवले, 10 डबे घसरले

0
27

लखनऊ,दि.23(वृत्तसंस्था)-उत्तरप्रदेशातील आजमगड ते दिल्ली जाणाऱ्या कैफियत एक्स्प्रेसने औरेया जिल्ह्यात दिल्ली-हावडा रेल्वे ट्रॅकवर एका डंपरला मंगळवारी मध्यरात्री 2.40 वाजता दरम्यान दिलेल्या धडकेत रेल्वे इंजिनसह 10 डबे उलटले आहे. यात 80 हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. यातील 28 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे. सर्व जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
कानपूर आणि इटावा दरम्यान असलेल्या अछल्दा रेल्वे स्टेशनजवळ वीरपूर गावाजवळ ही दुर्घटना घडली आहे. एक डंपर रेल्वे ट्रॅक पार करत असताना कैफियत एक्स्प्रेस त्याला जाऊन धडकली. यामुळे रेल्वेचे 10 डबे रुळावरुन घसरले.अपघातात 80 प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की अपघातात एकही मृत्यू झाल्याची आतापर्यंत माहिती नाही. अछल्दा येथील हेल्थ सेंटरवर 50 पेक्षा जास्त जखमींना दाखल करण्यात आले आहे. वास्तविक या सेंटरची क्षमता फक्त 15-20 रुग्णांची आहे.बुधवारी सकाळी कानपूर आणि इटावा येथून डॉक्टरांचे पथक पाचारण करण्यात आले आहे.कैफियत एक्स्प्रेस अपघातातील जखमींच्या माहितीसाठी आणि जखमींवर उपचारांसाठी नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला असून 05688276566 हा क्रमांक जारी करण्यात आला आहे.