लाहेरी शासकीय आश्रमशाळेचे सहा विद्यार्थी बेपत्ता

0
11

गडचिरोली : तालुक्यातील लाहेरी येथील शासकीय आश्रमशाळेतून सहा विद्यार्थी अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ माजली आहे. याप्रकरणी भामरागड पोलीस ठाण्यात मुलींच्या पालकांनी तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरूध्द भादंविचे कलम ३६४, ३६५, ३६६ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. बेपत्ता झालेल्यांमध्ये तीन मुलींचा समावेश आहे.

हे विद्यार्थी ३ जानेवारी रोजी आश्रमशाळेतून बेपत्ता झाले. सर्वत्र शोध घेऊनही त्यांचा थांगपत्ता न लागल्याने संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. नक्षलवाद्यांनी त्यांना बळजबरीने दलम मध्ये भरती तर केले नाही ना, अशी भीती व्यक्त केली जात आहे. अलीकडे दलममधील नक्षलवादी मोठ्या प्रमाणावर आत्मसमर्पण करीत असल्याने नक्षल चळवळीला हादरा बसला आहे. या पार्श्वभूमीवर, नक्षलवाद्यांनी आता दुर्गम भागातील शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आपले लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. तीन मुली बेपत्ता झाल्याची तक्रार विजा कुम्मा वाचामी रा. मलमपडूर यांनी लाहेरी उपपोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी या प्रकरणी विशेष पथक रवाना केले आहे.