एसटी संपाचा चेंडू आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

0
9

मुंबई,दि.20-पाच एसटी कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यात बुधवारी पहाटेपर्यंत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. मात्र कर्मचारी संघटना आपल्या मागणीवर ठाम राहिल्याने तिसऱ्या दिवशीही एसटी संपाचा तिढा सुटू शकला नाही. एसटी संपाचा चेंडू आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात गेला असून मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्रीच यावर निर्णय घेतील. दरम्यान संपकऱ्यांनी शुक्रवारी जेल भरो आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

राज्य सरकाराचा पगारवाढीचा प्रस्ताव ४ ते ७ हजारांचा आहे, तर आमची मागणी ७ ते ९ हजार इतकी आहे. सरकारच्या प्रस्तावानुसार एसटी महामंडळावर वार्षिक ११०० कोटींचा अतिरिक्त बोजा येणार आहे, कामगारांच्या मागणीनुसार २००० कोटींचा बोजा येईल. बुधवारी पहाटे दोनपर्यंत परिवहन भवनात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या, मात्र त्यात तोडगा निघाला नाही, अशी माहिती महाराष्ट्र एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष हनुमंत ताटे यांनी दिली.
कर्मचारी संघटनांबरोबरची चर्चा फिसकटल्यानंतर दिवाकर रावते यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तसेच संपाबाबत सविस्तर चर्चा केली. संपामुळे राज्यातील प्रवाशांचे हाल होत आहेत. सातारा, उस्मानाबाद आगारात दिवाकर रावते यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे एसटी कर्मचाऱ्यांनी दहन केले. तर कोल्हापुरात रावतेंविरोधांत जोरदार घोषणाबाजी केली.