अमोल यादवांच्या सहाआसनी स्वदेशी विमानाचं अखेर रजिस्ट्रेशन

0
23

मुंबई,दि.20(वृत्तसंस्था) : गेल्या सहा वर्षापासून विमानाच्या नोंदणीसाठी धडपडत असलेल्या अमोल यादव यांचे स्वदेशी बनावटीचे विमान झेपावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हील एव्हिएशन विभागाने अमोल यादव यांच्या विमानाचे रजिस्ट्रेशन करुन घेतले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संदर्भातलं पत्र अमोल यादव यांना देणार आहेत. मेक इन इंडिया अंतर्गत तयार केलेल्या अमोल यादव त्यांच्या सहाआसनी विमानाची परवानगी तांत्रिक कारणामुळे रखडली होती.

विमानाच्या नोंदणीसाठी होणाऱ्या दिरंगाईवर विमान प्राधिकरणाची थेट पंतप्रधान कार्यालयाकडून कानउघाडणी झाली होती. मुंबईतील चारकोपमधल्या घराच्या छतावर अहोरात्र मेहनत करुन अमोल यादव यांनी तयार केलेलं विमान केवळ डीजीसीएची नोंदणी होत नसल्यानं उड्रडाणापासून रखडलं होतं. अखेर यादव यांच्या विमानाची नोंदणी पूर्ण झाली.विशेष म्हणजे अमोल यादव यांचे हे विमान मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘मेक इन इंडिया वीक’मध्ये दिमाखात दाखवण्यात आलेले होते. त्यांच्या या प्रयत्नांचे कौतुक करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांपर्यंतही हा विषय पोहचवला होता.

महाराष्ट्र सरकारने या धडपडीचे कौतुक करत अमोल यांना 19 आसनी विमान बनवण्यासाठी जमीन आणि निधी देण्याचाही प्रस्ताव दिलेला आहे. अमोल यांनी 19 आसनी विमानाचा प्रोटोटाईप पूर्णही करत आणला आहे. पण त्याआधी 6 आसनी विमानाचे यशस्वी उड्डाण करुन दाखवणे त्यांना आवश्यक आहे. जेणेकरुन महाराष्ट्र सरकारसोबतचा त्यांचा मदतीचा करार पूर्णत्वास जाईल.ज्या प्रक्रियेसाठी भारतात 6 वर्षे गेली, ती अमेरिकेत एका महिन्याच्या आतही पूर्ण होऊ शकली असती. पण नोंदणी अमेरिकेत झाल्यास ते विमान स्वदेशी राहणार नाही, या भावनेतून अमोल यादव थांबले होते.