नक्षल्यांच्या गोळीबारात महिला जखमी

0
16

आल्लापल्ली(सुचित जम्बोजवार), दि.२०: पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन एका इसमास ठार करण्याच्या हेतूने नक्षल्यांनी त्याच्यावर गोळीबार केला. मात्र, या घटनेत संबंधित इसमाची पत्नी जखमी झाली. ही घटना काल(दि.१९)रात्री भामरागड तालुक्यातील लाहेरी उपपोलिस ठाण्यांतर्गत लाहेरीटोला येथे घडली. जैनी मुरा परसा असे जखमी महिलेचे नाव आहे.काल रात्री ११ वाजताच्या सुमारास साध्या वेशभूषेतील काही नक्षलवादी लाहेरीटोला येथील मुरा परसा याच्या घरी गेले. त्यांनी मुराच्या घराचे दार ठोठावले. मुराची पत्नी जैनी हिने खिडकीतून डोकावून पाहताच नक्षल्यांनी दारुची मागणी केली. मात्र, जैनीने दारु नसल्याचे सांगताच नक्षल्यांनी खिडकीतून गोळीबार केला. जैनीच्या डाव्या मांडीला गोळी लागल्याने ती जखमी झाली. गोळीबार केल्यानंतर नक्षल्यांनी घरासमोर पत्रके टाकली. मुरा परसा हा पोलिस खबऱ्या असल्याचे नक्षल्यांनी त्या पत्रकात म्हटले आहे.दरम्यान, जैनी परसा हिला अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात नेऊन उपचार करण्यात आले. तेथे उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे, पोलिस निरीक्षक सुरेश मदने व त्यांच्या सहकाऱ्यांनी जैनीची भेट घेऊन विचारपूस केली. त्यानंतर तिला गडचिरोली येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे.