सिंचन घोटाळा प्रकरणात आणखी चार गुन्हे दाखल

0
7

नागपूर,दि.12 : राज्यभरात खळबळ उडवून देणा-या बहुचर्चित सिंचन घोटाळ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज अचानक सक्रीय होत चार गुन्हे दाखल केले. हिवाळी अधिवेशनामुळे राजकीय वातावरण गरम झाले असतानाच घडलेल्या या आकस्मिक घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.विशेष म्हणजे आजच राष्ट्रवादी व काँग्रेसच्यावतीने हल्लाबोल आंदोलन करण्यात आले ते सुध्दा ताकदिने.
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत येणा-या गोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील विविध कामांच्या निविदा प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा जोरदार आरोप झाला होता. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालकांनी नागपूर एसीबीला चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार, स्थानिक युनिटचे अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या नेतृत्वात एसीबीच्या पथकाने या गैरव्यवहाराची प्रदीर्घ चौकशी केली. त्यात संबंधित कामाच्या निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले. जलसंपदा विभागातील तत्कालीन अभियंते , विभागीय लेखाधिकारी, तसेच कालव्याच्या कामाचे कंत्राटदार, त्यांचे भागिदार, आममुख्त्यारपत्र धारक यांचा या गैरव्यवहारात सहभाग असल्याचेही चौकशीत स्पष्ट झाले होते.

सिंचन घोटाळ्याचे चार FIR

1. प्रकल्प
मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेच्या नवतळा, मेटेपार, चिखलापार शाखा कालव्याचे मातीकाम, बांधकाम आणि अस्तरीकरणाचे काम
– आरोप – अवैध निविदा अद्यावतीकरणास मंजुरी दिली
– निविदेचे मूल्य वाढवले
-अपात्र कंत्राटदाराला पात्र ठरवले
आरोपी – तत्कालीन कार्यकारी अभियंता, विभागीय लेखाधिकारी, अधीक्षक अभियंता
2. प्रकल्प
गोसीखुर्द डावा कालवा
आरोप-अवैध निविदा अद्यावतीकरणास मंजुरी दिली
– निविदेचे मूल्य वाढवले
-कंत्राटदाराला गैर पद्धतीने निविदा प्रक्रियेत सहभागी करून घेतले
आरोपी –– तत्कालीन कार्यकारी अभियंता, विभागीय लेखाधिकारी, अधीक्षक अभियंता
3. प्रकल्प   
-मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेच्या वडाला शाखा कालव्याचे काम
आरोप -कंत्राटदाराला गैर पद्धतीने निविदा प्रक्रियेत सहभागी करून घेतले
आरोपी –तत्कालीन कार्यकारी अभियंता, विभागीय लेखाधिकारी, अधीक्षक अभियंता
4. प्रकल्प
गोसीखुर्द उजव्या कालव्या वरील घोडाझरी शाखा कालवा
आरोप--निविदेचे मूल्य वाढवले -अवैध निविदा अद्यावतीकरणास मंजुरी दिली
आरोपी-तत्कालीन कार्यकारी अभियंता, विभागीय लेखाधिकारी, अधीक्षक अभियंता
दरम्यान, अजित पवार यांना सिंचन घोटाळ्याप्रकरणी क्लीन चिट दिलेली नाही, असे उत्तर एसीबीने अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीला दिले होते.एसीबीने या घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांची काही दिवसांपूर्वी चौकशी केली होती. विशेष म्हणजे, या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांचीही चौकशी लाचलुचपत विभागाने केली होती..