रेपनपल्लीजवळ आणखी एकाची नक्षल्यांकडून हत्या

0
11

गडचिरोली, ता.९–रविवारी (ता.८) दुपारी ताटीगुडम येथील भर कोंबडा बाजारात सशस्त्र नक्षल्यांनी एका युवकाची गोळी घालून हत्या केल्यानंतर त्याच रात्री पुन्हा नजीकच्या चिंतलगुडा येथील एका युवकाचा गळा कापून खून केला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.
मल्लेश पेंदाम (३०) असे मृत युवकाचे नाव असून, तो रेपनपल्ली उपपोलिस ठाण्यांतर्गत चिंतलगुडा येथील रहिवासी होता. रविवारी रात्री सशस्त्र नक्षलवादी चिंतलगुडा येथे गेले. त्यांनी मल्लेशला झोपेतून उठवून त्याचे हातपाय बांधून गावाबाहेर नेले. त्यानंतर छल्लेवाडा येथील बसस्थानकाजवळ त्याची गळा कापून हत्या केली. रेपनपल्ली-कमलापूर परिसरात नक्षल्यांनी एकाच दिवशी दोघांची हत्या केली. रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास अहेरी तालुक्यातील रेपनपल्ली उपपोलिस ठाण्यापासून अवघ्या ३ किलोमीटर अंतरावरील ताटीगुडम येथे भर कोंबडा बाजारात नक्षल्यांनी नरेंद्र मदनय्या येर्रावार (२४) या युवकाची हत्या केली. त्यानंतर याच रात्री चिंतलगुडा येथे जाऊन मल्लेश पेंदाम यास ठार केले. एकाच दिवशी दोन हत्या झाल्याने नागरिक प्रचंड दहशतीत आहेत.