गडचिरोली, ता.9-कर्मचा-याच्या पदोन्नती, पदावनती प्रकरणात हयगय करून न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कामगार न्यायालयाने गडचिरोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी संपदा मेहता यांना संमन बजावण्याचे आदेश गडचिरोली पोलिसांना दिले आहेत.
सविस्तर वृत्त असे की, गडचिरोली जिल्हा परिषदेतील तीन कर्मचा-यांनी पदोन्नतीत घोळ होऊन आपणास डावलल्याबाबत चंद्रपूर येथील औद्योगिक न्यायालयात यूएलपी ०५/ २०१३,१५/ २०१३ व १६/२०१३ अन्वये याचिका दाखल केली होती. त्यानंतर तिघांनीही पुन्हा स्वतंत्रपणे याचिका दाखल केल्या होत्या. यावर न्यायालयाने तिघांबाबत एकत्रित निकाल देऊन त्यांची पदावनती रद्दबातल ठरविली असून, पदोन्नती झालेल्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. परंतु जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिका-यांनी सहा महिने लोटूनही न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याने पीडित कर्मचा-यांनी कामगार न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. त्यावर कामगार न्यायालयाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी संपदा मेहता यांना संमन बजावण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. विशेष म्हणजे, याप्रकरणी जिल्हा परिषद प्रशासनाने सीईओ संपदा मेहता यांचे नाव उपरोक्त प्रकरणातून कमी करण्याची विनंती न्यायालयाला केली होती. परंतु न्यायालयाने ही विनंती फेटाळून लावली. कायदेतज्ज्ञांच्या मते या प्रकरणात सीईओंवर जामीन मिळविण्याची पाळी येऊ शकते. याप्रकरणी याचिकाकर्त्यांच्या वतीने नागपूरचे विधिज्ज्ञ अॅड. वानखेडे यांनी काम पाहिले.