योग जात नव्हे, जीवन बदलतो-बाबा रामदेव

0
16

चंद्रपूर,दि.20ः- आपल्या शरीराच्या आत्मशुध्दीसाठी व निरामय जीवन व्यतीत करण्यासाठी योगाची निर्मिती करण्यात आली.योग जात नाही तर जीवन बदलतो. आधुनिक काळात रोगांवर मात करण्यासाठी योग हाच अंतिम उपाय आहे. योगाची संकल्पना विशाल आहे. परंतु दुर्दैवाने आपल्या देशात योगाला एका विशिष्ट धर्माशी जोडून त्याची विशालता कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा त्यांचा प्रयत्न त्यांच्या कुपोषित बुध्दीचे दर्शन घडवित असून योग हे सर्व समाजाला, जाती-धर्माला एकत्र करणारे एक विलक्षण तंत्र आहे. योग केल्याने जात तर बदलत नाहीच उलट त्याच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असते, असे प्रतिपादन योगऋषी व पतंजली योगपीठाचे सर्वेसर्वा बाबा रामदेव यांनी केले.श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित मिट-द-प्रेस या कार्यक्रमात ते बोलत होते.

आज संपूर्ण विश्‍वाने योगाला आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनविले आहे. योगामुळे आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडून येऊ शकतो याची अनुभूती अनेकांना झाली आहे. यामुळे काहींच्या विचारातही बराच फरक पडत असलेला दिसून येत आहे. ज्यांनी पूर्वी योगाला एका विशिष्ट धर्माशी जोडून आपला राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला तेही कमी अधिक प्रमाणात योगाशी जुळल्या गेले आहे, किंबहूना त्यांना त्याचे महत्त्व पटले आहे. राहुल गांधी आजकाल जिम व्यतिरिक्त योगा करायला लागले आहेत. योगामुळे ‘अच्छे दिन’ येऊ शकतात याची अनुभूती कदाचित त्यांना आली असावी, असा टोला योगऋषी रामदेव बाबा यांनी हाणला