वांद्रे येथे मराठीचे विद्यापीठ, मराठी भाषेचे राज्यातील पहिलेच विद्यापीठ

0
17

मुंबई,दि.27 : ग्रंथालीच्या पुढाकाराने मराठी भाषेचे राज्यातील पहिले विद्यापीठ वांद्रे येथे सुरू होणार आहे. यासाठी आवश्यक जागेच्या हस्तांतरणाचा औपचारिक कार्यक्रम मराठी भाषा दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधान भवनात होणार आहे.मुंबई महापालिकेच्या जागेत हे विद्यापीठ उभे राहणार आहे. वांद्रे पश्चिम येथे हे विद्यापीठ सुरू व्हावे याकरिता भाजपाचे आमदार आशिष शेलार या विषयावर दीड वर्षापासून काम करत आहेत. वांद्रे येथील बँंडस्टँड येथील जागा महापालिकेने विद्यापीठाला देण्याचे मान्य केले आहे. यासंदर्भातील पत्र मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ग्रंथालीला दिले जाणार आहे. ग्रंथालीचे संस्थापक दिनकर गांगल यांच्यासह ग्रंथालीचे पदाधिकारी या वेळी उपस्थित राहणार आहेत.
राज्यात मराठीसाठी स्वतंत्र विद्यापीठ व्हावे ही मागणी स्वातंत्र्यपूर्व काळापासून होत आहे. राज्याची स्थापना झाल्यानंतर मराठी विद्यापीठ स्थापन करावे, अशी मागणी अखिल भारतीय साहित्य संमेलनातून करण्यात आली. मात्र गेल्या साठ वर्षांत त्याला मूर्त रुप आलेले नाही.
अशी असेल रचना-
-मराठी भाषेतील सर्व ग्रंथ व पुस्तकांनी सज्ज असे अद्ययावत ग्रंथालय असेल.
-मराठी भाषेच्या संवर्धन व प्रचारासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील.
-परीक्षा, संशोधन, लेखन असे उपक्रम विद्यापीठामार्फत राबविण्यात येतील.
केंद्र सरकारच्या सांस्कृतिक खात्याने आजवर तमीळ (२००४), संस्कृत (२००५ ), तेलुगू व कन्नड (२००८), मल्याळम (२०१३ ) आणि ओडिया (२०१४ ) या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्यापैकी तमीळ (१९८१), तेलुगू (१९८५ ), कन्नड (१९९१ ), मल्याळम (२०१२ ) या भाषांची आपापल्या राज्यांत स्वतंत्र विद्यापीठे आहेत. संस्कृत भाषेचीही केंद्रीय, अभिमत आणि खासगी अशी अनेक विद्यापीठे देशाच्या वेगवेगळ्या भागांत कार्यरत आहेत. उर्दू, हिंदी आणि इंग्रजीसह परकीय भाषांसाठी केंद्रीय विद्यापीठे आहेत. मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठ (१९९८) हे हैदराबादला आहे तर महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय (१९९७) महाराष्ट्रात वर्धा येथे आहे. मात्र मराठीचे विद्यापीठ नव्हते.
राज्यातील हे पहिले मराठीचे विद्यापीठ असणार आहे. त्यामुळे त्याची वैशिष्ट्यपूर्ण रचना व्हावी. त्यामध्ये भाषेसाठी पोषक उपक्रम कोणते व कसे असावेत, याबाबतचे नियोजन सुरू असून प्रत्यक्ष जागा ताब्यात आल्यानंतर कामांना सुरुवात होणार आहे.