दिल्लीच्या सुरक्षेत पंतप्रधान मोदींनी प्रथमच घातले लक्ष, पोलिस आयुक्तांना केल्या सूचना

0
8

नवी दिल्ली- देशाच्या राजधानीत कायदा आणि सुव्यवस्थेची बिघडलेली स्थिती सुधारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीचे पोलिस आयुक्त बी. एस. बस्सी यांना बोलवून आपली नाराजी व्यक्त केली. नुकत्याच झालेल्या तोडफोडीच्या घटनांची चौकशी करुन दोघींवर गुन्हे दाखल करण्याचे पंतप्रधानांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे दक्षिण दिल्लीच्या वसंत विहार येथील ख्रिश्चन शाळेवर काल रात्री काही समाजकंटकांनी हल्ला करुन तोडफोड केली. एवढेच नव्हे तर पैसेही लुटून नेले. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांचे शिक्षण या शाळेत झाले आहे.
वसंत विहार येथील होली चाईल्ड ऑक्सिलिअम शाळेवर काल रात्रीच्या सुमारास काही समाजकंटकांनी हल्ला चढवला. शाळेतील सामानाची तोडफोड केली. या घटनेला दिल्लीतील ख्रिश्चन समुदायावर झालेल्या हल्ल्यांशी जोडले जात आहे. यामुळे ख्रिश्चन समुदायात संतापाचे वातावरण आहे.

पोलिस आणि शाळेच्या प्रशासनाने सांगितले आहे, की हे चोरीचे प्रकरण आहे. या शाळेतील सीसीटीव्ही फोडण्यात आले असून प्राचार्यांच्या कार्यालयातून पैसेही चोरण्यात आले आहे. डोनेशन बॉक्समधील पैसेही गायब आहेत.
यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन गृहसचिव एल. सी. गोयल यांच्याशी फोनवरुन चर्चाही केली. यावेळी मोदी म्हणाले, की तोडफोड आणि गुन्हेगारी स्वरुपाच्या घटनांवर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. महिलांना राजधानीत सुरक्षिततेचे वातावरण मिळावे यासाठी आणखी प्रयत्न करावे लागतील.
दिल्लीचे नियोजित मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ख्रिश्चन शाळेत झालेल्या तोडफोडीवर ट्विटरवर नाराजी व्यक्त केली आहे. अशा घटना सहन केल्या जाणार नाही, असेही म्हटले आहे.
तोडफोडीमुळे आज शाळा बंद ठेवण्यात आली आहे. तशी नोटीस शाळेवर लावण्यात आली आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी या शाळेच्या अॅल्युमनी आहेत. त्यांनी दुपारी शाळेला भेट दिली.