दिल्लीला भ्रष्टाचारमुक्त राज्य करणार – अरविंद केजरीवाल

0
13

नवी दिल्ली, दि. १४ – दिल्लीत ऐतिहासिक विजय मिळवणा-या आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी दुपारी दिल्लीच्या मुख्यमंंत्रीपदाची शपथ घेतली. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी दिल्लीकर मोठ्या संख्येने रामीलाला मैदानात उपस्थित होते. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच केजरीवाल यांनी दिल्लीला देशातील पहिले भ्रष्टाचारमुक्त राज्य करण्याची घोषणा केली आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत ७० पैकी तब्बल ६७ जागांवर विजय मिळवत इतिहास रचणा-या आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांच्या सरकारचा आज दिल्लीतील रामलीला मैदानात शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्यात केजरीवाल यांच्यासह मनिष सिसोदीया, आसिम अहमद खान, संदीप कुमार, सत्येंद्र जैन, गोपाल राय, जितेंद्रसिंह तोमर यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर केजरीवाल यांनी रामलीला मैदानातील उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले. काँग्रेस व भाजपाचा पराभव हा अहंकारामुळेच झाला. आपणही दिल्लीतील विजयाचा अहंकार बाळगू नये असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला अहंकाराची बाधा झाली. लोकसभा निवडणुकीत आपने देशभरातील जागा लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्या निवडणुकीत आपची अवस्था काय झाली हे सर्वांनीच बघितले होते. त्यामुळे आता आपच्या नेत्यांनी सांभाळून रहावे अशा शब्दात त्यांनी पक्षातील नेत्यांचेही कानटोचले.