पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार बारामतीत एकाच व्यासपीठावर…

0
17

पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीत दाखल झाले आहेत. 12 च्या सुमारास नरेंद्र मोदी चाकणहून बारामतीत दाखल झाले. बारामतीतील विमानतळावरून पंतप्रधान थेट विद्या प्रतिष्ठानमधील शैक्षणिक संकुलात दाखल झाले आहेत. तेथील संपूर्ण शैक्षणिक संकुलाची व पवारांना मिळालेल्या भेटवस्तूंच्या संग्राहलयाची पाहणी केली. त्यानंतर शारदानगर- माळेगाव येथील विज्ञान कृषि केंद्राच्या ठिकाणी पोहचले आहेत.
पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह, राज्याचे कृषिमंत्री एकनाथ खडसे, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, अजित पवार, सुप्रिया सुळे आदी नेते उपस्थित आहेत.
पंतप्रधान कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी बारामतीतील शारदानगर येथे होणा-या शेतकरी मेळाव्यात 22 मिनिटे मार्गदर्शन करतील. तसेच ते यावेळी राजकीय विषयावर कोणतेही भाष्य करणार नाहीत. त्यांचे 22 मिनिटांचे संपूर्ण भाषण शेतीशी व विकासाशी निगडीत असेल, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी शेतीविषयी काही मोठ्या घोषणा करतात याकडे बारामतीकरांचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्र्यांनी केले मोदींचे स्वागत-
पुण्यातील लोहगाव विमानतळावर आज सकाळी सव्वानऊच्या सुमारास आगमन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, पुण्याचे महापौर दत्तात्रय धनवकडे आणि खासदार अनिल शिरोळे यांनी त्यांचे स्वागत केले. विमानतळावर कार्यकर्त्यांशी 5 मिनिटे संवाद साधल्यानंतर मोदी चाकणकडे हेलिकॉप्टरने रवाना झाले. सकाळी सव्वादहाच्या सुमारास मोदींच्या हस्ते चाकणमधील जनरल इलेक्ट्रिक या कंपनीच्या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी उद्योग समुहातील शिष्टमंडळाशी काही वेळ संवाद साधला.
पीएमओने जाहीर केल्यानुसार पंतप्रधानांचा महाराष्ट्रातील आजचा दौरा असा असेल..
– सकाळी 7.20- दिल्लीहून पुण्याकडे प्रयाण
– 9.00 – पुणे विमानतळावर आगमन
– 9.10 – हेलिकॉप्टरने चाकणकडे प्रयाण
– 9.30 – चाकणमध्ये जनरल इलेक्ट्रीकल्स प्रकल्पाचे उद्घाटन
– 10.45 ला हेलिकॉप्टरने बारामतीकडे प्रयाण
– 11.40- बारामती एअरपोर्टवर आगमन
– 11.50 ला विद्या प्रतिष्ठान संस्थेस भेट
– 12.10 – भिगवण रस्त्याने माळेगावकडे प्रयाण
– 12.20- अप्पासाहेब पवार सभागृहाचे उद्घाटन समारंभ
– 12.40- कृषी विज्ञान केंद्राची पाहणी
– 1.00- वाजता सेंटर फॉर एक्सलन्स इमारतीचे भूमीपूजन
– 1.10- शेतकरी मेळावा भाषण
– 2.00- शरद पवार यांच्या निवासस्थानी स्नेहभोजन
– 2.30- हेलिपॉप्टरने पुणे एअरपोर्टकडे रवाना
– 3.30- पुण्याहून मुंबईकडे रवाना
– रात्री 9 च्या सुमारास दिल्लीकडे प्रयाण.