36 C
Gondiā
Friday, May 3, 2024
Home Top News काँग्रेस नेते पतंगराव कदम यांचे निधन

काँग्रेस नेते पतंगराव कदम यांचे निधन

0
16

मुंबई,दि.१०~   लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री पतंगराव कदम (वय ७२ )यांचे निधन झाले. लीलावतीमध्ये अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु होते. कदम यांचे मूत्रपिंड काम करत नसल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र या उपचारांना साथ न मिळाल्याने अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. कदम यांच्या निधनाने सहकारातील एक दिग्गज नेता हरपला आहे. त्यांच्या जाण्याने कॉंग्रेस पक्षाला मोठी पोहोचली आहे. अत्यंत परखडपणे व स्पष्ट बोलणारे नेते अशी त्यांची ख्याती होती. शनिवारी म्हणजे उद्या सकाळी १० वाजता त्यांचा पार्थिव पुण्यातील भारती विद्यापीठ येथे आणला जाणार आहे. सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथे सायंकाळी चार वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
डॉ. पतंगराव कदम हे भारती विद्यापीठाचे संस्थापक असून ते याचे संस्थापक-कुलगुरु देखील आहेत. भारती विद्यापीठ युनिव्हर्सिटी पुणे याच्या छत्राखाली देश व परदेशामध्ये १९० पेक्षा अधिक शैक्षणिक संस्था असून ही भारतातील नामवंत व अग्रेसर संस्थांपैकी एक आहे.
डॉ. कदम सोनहिरा सहकारी कारखाना लि. वांगी, ता. कडेगाव, जि.सांगली, सागरेश्वर सहकारी सूत गिरणी व कृष्णा-वेरळा सहकारी सूत गिरणी लि. पलूस, जि.सांगली, ग्राहक भांडार आणि एक मल्टीशेड्यूल्ड बँक अशा अनेक सहकारी संस्थांचे संस्थापक आहेत. नवी दिल्ली आणि दुबई येथे त्यांनी अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि संगणक तंत्रज्ञान अशी महाविद्यालये स्थापन केली आहेत. त्यांच्या या सेवेची अनेक संघटनांनी दखल घेऊन त्यांना पुरस्कार दिले आहेत. “लोकश्री”, इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स, नवी दिल्ली यानी दिलेले, सामाजिक व शैक्षणिक योगदानाबद्दल “मानवता सेवा अवॉर्ड”, मराठा सेवा संघ यांनी शिक्षण क्षेत्रातील त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल प्रदान केलेला “मराठा विश्वभूशण पुरस्कार”, आयएमएम, नवी दिल्लीतर्फे देण्यात येणारा “एक्सलन्स अवॉर्ड इन एज्युकेशन”, “शहाजीराव पुरस्कार”, कोल्हापुरातील “उद्योग भूषण पुरस्कार” आदी पुरस्काराने त्यांचा सन्मान झाला.
पतंगराव कदम यांनी पुण्यात एका छोट्याशा खोलीत १० मे १९६४ मध्ये सुरू केलेल्या भारती विद्यापीठाने शालेय विद्यार्थ्यांसाठी गणित व इंग्रजी विषयांच्या स्पर्धा परीक्षा घेण्याच्या उपक्रमाने आपल्या कार्याची सुरुवात केली. डॉ. कदम यांच्या व्यापक सामाजिक बांधिलकीचा एक आविष्कार म्हणजे भारती विद्यापीठाने ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी चालविलेली इंग्रजी व मराठी माध्यमाची निवासी शाळा. केवळ मुलींसाठी चालविलेली इंजिनीअरिंग आणि आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कॉलेज, शाळा आणि एक तंत्रनिकेतन ही भारती विद्यापीठाची आणखी काही वैशिष्ट्ये.
भारती विद्यापीठाच्या स्थापनेवेळी डॉ. पतंगराव कदम यांचे वय होते जेमतेम १९ वर्षांचे. परंतु, त्यांची दूरदृष्टी, स्वप्ने पाहण्याची व साकार करण्याची क्षमता यांचे वर्णन ‘अफाट’ या शब्दानेच होऊ शकते. ज्या काळात अभिमत विद्यापीठाच्या संकल्पनेचा फारसा गाजावाजा झालेला नव्हता त्या काळात ‘आमच्या या संस्थेचे रूपांतर विद्यापीठामध्ये करावयाचे आहे’अशा उद्देश्याची नोंद त्यांनी संस्थेच्या घटनेत अंतर्भूत केली होती.