छगन भुजबळ यांना दोन वर्षांनंतर जामीन मंजूर

0
9

मुंबई,दि.4(विशेष प्रतिनिधी)ः- महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरण आणि बेहिशेबी मालमत्ता जमवल्याच्या आरोपावरून गेल्या दोन वर्षांपासून अटकेत असलेले महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना अखेर आज जामीन मंजूर करण्यात आला आहे. ५ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची मुक्तता करण्यात आली असून कदाचित आजच संध्याकाळी ते आर्थर रोड तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

१४ मार्च २०१६ रोजी छगन भुजबळ यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून सातत्यानं ते जामिनासाठी प्रयत्न करत होते, पण त्यांना दिलासा मिळत नव्हता. मध्यंतरी त्यांची प्रकृतीही चांगलीच खालावली होती. ते कारण पुढे करूनही त्यांनी जामीन अर्ज केला होता. मात्र तोही नामंजूर झाला होता. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यातील (मनी लॉंड्रिंग) कलम ४५ अन्वये बेहिशेबी मालमत्ता जमा करणाऱ्यांना गुन्हा सिद्ध होईपर्यंत अमर्याद काळ तुरुंगात ठेवण्याची तरतूद होती. ही तरतूद सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरविली होती.