हावडा मेलच्या इंजिनला आग; चालकाचा मृत्यू

0
14

नागपूर,दि.7–मुंबईच्या दिशेने भरधाव निघालेल्या १२८१० हावडा -मुंबई मेलच्या इंजिनमध्ये अचानक धूर पसरल्यावर काय झाले याची पाहणी करीत असताना सहायक लोको पायलटचा खाली पडून मृत्यू झाला, तर लोको पायलटने आकस्मिक ब्रेकचा वापर करून गाडी थांबवली व मोठा अनर्थ टळला. एस.के. विश्वकर्मा (वय ३०) असे या घटनेत मृत्यू झालेल्या सहायक लोको पायलटचे नाव आहे.चालक डी.आय. ब्रम्हो हे जखमी झाले आहेत.
रविारी दुपारी हावडा येथून मुंबईकडे जाणारी रेल्वे नागपूर स्थानकावर आली. नागपूर येथून सुटल्यानंतर वर्धा रेल्वे स्थानकावर थांबा घेतल्यानंतर ती पुढच्या प्रवासासाठी निघाली. पुलगाव रेल्वे स्थानक सोडल्यानंतर अमरावती जिल्हयातील तळणीजवळ मेलच्या इंजिनला अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने गती कमी करीत ट्रेन थांबविली. घाबरलेल्या प्रवाशांनी रेल्वेमधून उड्या घेत शेतात आश्रय घेतला. यातच रेल्वेचे सहाय्यक चालक एस.के. विश्‍वकर्मा हे जखमी झाले. त्यांना पुलगाव येथील इंडियन मिल्ट्री डेपोच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला. चालक डी.आय. ब्रम्हो हे जखमी झाले. यात कोणताही प्रवासी जखमी झालेला नाही. आग विझविल्यानंतर दुसरे इंजिन लावून रेल्वे मुंबईकरिता रवाना करण्यात आली. प्रवासी असलेल्या कोणत्याही डब्याची हानी झाली नाही. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही.