येदियुरप्‍पा थोड्याच वेळात घेणार शपथ

0
4

बंगळुरू ,दि.17(वृत्तसंस्था)- कर्नाटकात सत्तास्थापनेसाठी राज्यपाल वजुभाई वाला यांनी बुधवारी रात्री भाजपला निमंत्रित केले. यानुसार भाजप नेते येदियुरप्पा गुरुवारी सकाळी नऊ वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. येदियुरप्पा यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी १५ दिवसांची मुदत दिली असली तरी येदियुरप्पा २१ मे रोजी बहुमत सिद्ध करतील. शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा उपस्थित राहणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी भाजपाला 15 दिवसांची मुदत दिली आहे. एका अपक्ष आमदारानं भाजपाला पाठिंबा दिल्यानं भाजपाचं संख्याबळ 105 वर पोहोचलं आहे. त्यामुळे बहुमतासाठी त्यांना आणखी 7 आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे.

काँग्रेसने बुधवारी रात्री दाखल केली याचिका, रात्री 2.10 वाजता सुनावणीस सुरुवात

भाजपला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित करण्याच्या निर्णयाला काँग्रेसने बुधवारी रात्री सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. हा प्रकार लोकशाहीची हत्या असल्याचे नमूद करत सरन्यायाधीशांनी तातडीने यात हस्तक्षेप करावा, अशी विनंती काँग्रेसने केली. सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रारची भेट घेऊन काँग्रेस नेते अभिषेक सिंघवी यांनी ही याचिका तातडीच्या सुनावणीसाठी घ्यावी, अशी विनंती केली.

त्‍यानंतर सरन्‍यायाधीश दीपक मिश्रा यांच्‍या अध्‍यक्षतेखालील 3 न्‍यायाधीशांच्‍या बेंचने रात्री 2.10 वाजता काँग्रेसच्‍या याचिकेवर सुनावणी सुरू केली. सुप्रीम कोर्टाने दोन्‍ही बाजूंचे म्‍हणणे ऐकून घेतल्‍यानंतर येदियुरप्‍पांना शपथ घेण्‍यापासून रोखण्‍यास नकार दिला. ‘या अर्जावर नंतरही सुनावणी करता येईल’, असे सांगत या प्रकरणाची सुनावणी उद्यापर्यंत तहकूब करत असल्‍याचे सुप्रीम कोर्टाने म्‍हटले आहे. येदियुरप्‍पांसहित संबंधित लोकांना याचिकेवर उत्‍तर देण्‍याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत.