‘ते’ बेपत्ता सात युवक-युवती नक्षल चकमकीतच ठार?

0
10
file photo

गडचिरोली,दि.21 : भामरागड तालुक्यातील कसनासूर येथे गेल्या २२ एप्रिल रोजी झालेल्या चकमकीपासून बेपत्ता झालेले नक्षल कमांडर साईनाथ याच्या गट्टेपल्ली या गावातील सात युवक-युवती पोलीस-नक्षल चकमकीतच ठार झाल्याची दाट शक्यता समोर येत आहे. ते सर्वजण नक्षल चळवळीशी जुळलेले होते, अशी माहिती पोलिसांना प्राप्त झाली आहे.

या चकमकीत नक्षल कमांडर साईनाथ हासुद्धा मारल्या गेला. चकमकीनंतर तीन-चार दिवसपर्यंत काही नक्षल्यांचे मृतदेह जंगलात तर काहींचे इंद्रावती नदीत मिळाले होते. त्या चकमकीतील एकूण ३४ जणांपैकी २० जणांची ओळख पटली नाही. त्या ओळख न पटलेल्या मृतदेहांमध्ये गट्टेपल्लीतील बेपत्ता युवक-युवतींचाही समावेश असल्याचे म्हटले जात आहे.  नक्षल चकमकीपासून गट्टेपल्ली येथील इरपा वृत्ते मडावी (२३), मंगेश बकलू आत्राम (२६), रासो पोचा मडावी (२२), मंगेश चुंडू मडावी (१९), अनिता पेडू गावडे (२१), नुसे पेडू मडावी (२३) हे सहा युवक व युवती बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबियांनी पोलिसात दाखल केली आहे. याशिवाय रासो चुकू मडावी ही १५ वर्षाची अल्पवयीन मुलगीही बेपत्ता आहे. त्यामुळे तिचे अपहरण झाल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. विशेष म्हणजे त्यांच्यापैकीच एक असलेली बुज्जी करवे उसेंडी (१७) ही युवतीही चकमकीत ठार झाली असून तिची ओळख पटवून पालकांनी त्याच वेळी तिचा मृतदेह ताब्यात घेतला होता. आठपैकी एक युवती नक्षल्यांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाली याचा अर्थ बेपत्ता असलेले बाकी सात युवक-युवतीही त्यावेळी नक्षल्यांसोबतच होते व तेसुद्धा त्याच चकमकीत मारले गेले असावे, अशी शक्यता वर्तविली जात आहे.