अवकाळी पावसामुळे १००० कोटींची हानी, १७ हजार हेक्टरवर पिकांना फटका

0
14

मुंबई – राज्यात गेल्या दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या गहू, ज्वारी या रब्बी पिकांचे जवळपास एक हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले, अशी माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली. दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट आणि आता पुन्हा अवकाळी पाऊस अशा संकटामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. या नव्या नुकसानीमुळे राज्यापुढे पुन्हा अर्थसंकट निर्माण झाले आहे.

मंगळवारी होणार्‍या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषयावरच चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शेतकर्‍यांना मदत देण्यासाठी कोणकोणत्या विभागाच्या योजनांना कात्री लावावी यावरही या बैठकीत चर्चा होऊन शेतकर्‍यांना द्यावयाच्या नुकसान भरपाईबद्दल निर्णय अपेक्षित आहे.

मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील अवकाळी पावसाचा आढावा घेत पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, असे आदेश दिले. नुकसानीचे पंचनामे करताना शेतकरी हा घटक मानून वैयक्तिक पंचनामे करावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.