पुण्यातल्या मेट्रोला मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील

0
15

पुणे, दि. ७ – मुंबईपाठोपाठच आता पुण्यातही मेट्रो रेल्वे धावणार असून शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे. पुण्यामधल्या प्रचंड वाढलेल्या रहदारीवर दीर्घकालीन तोडगा म्हणून मेट्रो रेल्वेची मागणी ब-याच काळापासून होत होती. आज शनिवारी या संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक झाली असून पुण्यातल्या मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी देण्यात आल्याची घोषणा फडणवीस यांनी केली आहे.
निगडी ते स्वारगेट असा पुणे मेट्रोचा पहिला टप्पा असून त्यामुळे अत्यंत वर्दळीच्या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.तसेच वनाज कॉर्नर (कोथरूड) ते रामवाडी (नगर रोड) या दुस-या कॉरिडॉरबाबत मतमतांतरे असल्याने याबाबत एक समिती स्थापन केली जाईल अशीही घोषणा फडणवीस यांनी केली.
पुणे शहरातील मेट्रो एलिव्हेटेड हवी की भुयारी, या एकाच मुद्यांवर यार्डात पडून राहिलेल्या पुणे मेट्रोबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी कौन्सिल हॉल येथे बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार शरद पवार, सुप्रिया सुळे, स्थानिक खासदार अनिल शिरोळे, वंदना चव्हाण, श्रीरंग बारणे, पालकमंत्री गिरीश महाजन, मंत्री दिलीप कांबळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पुणे-पिंपरी शहरातील सर्व आमदारांसह दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यानंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, वनाज कॉर्नर ते रामवाडी या दुस-या टप्प्यातील मार्गाबाबत अनेकांनी वेगवेगळ्या भूमिका व सूचना मांडल्या आहेत. या सूचनांचे निराकरण करण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखालील एक समिती नेमली जाईल. या समितीत अरूण फिरोदिया, शशिकांत लिमये, डॉ. विजय केळकर यांचा समावेश असेल. ही समिती एक महिन्यात आपला अहवाल देईल. त्यानुसार समितीचे निष्कर्ष पाहून राज्य सरकार दुस-या टप्प्याला परवानगी देईल व त्यानंतर या मार्गाचे काम सुरु होईल. यासाठी मेट्रोमॅन ई. श्रीधरन यांचाही सल्ला घेतला जाईल असे फडणवीस यांनी सांगितले.