BJP-PDP अभद्र युतीवर शिवसेनेचा हल्लाबोल

0
10

मुंबई- जम्मू-कश्मीरमध्ये भाजप-पीडीपीने एकत्र येऊन सरकार स्थापन केल्यानंतर शिवसेनेने प्रथमच दोन्ही पक्षांवर हल्लाबोल करीत नवे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांना लांडग्याची अवलाद असे म्हटले आहे. तसेच भाजप व पीडीपी यांची जम्मू-कश्मीरमध्ये झालेले युती म्हणजे अभद्र घटना आहे असेही म्हटले आहे. ‘सामना’ या आपल्या मुखपत्रात अग्रलेख लिहून शिवसेनेने भाजपवरही जोरदार टीकास्त्र सोडले आहे. भाजपने यावर कोणतेही प्रतिक्रिया दिली नाही तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुफ्ती यांच्यासमवेत भाजपने हातमिळवणी केल्याने त्यांना फार मोठी किंमत मोजावी लागेल असे म्हटले आहे.
‘सामना’त आज लिहलेल्या अग्रलेखात म्हटले आहे की, मुफ्ती मोहम्मद सईद यांच्याशी हातमिळवणी करून भाजपने जम्मू-कश्मीरात सरकार स्थापन केले. पण हे बेरजेचे राजकारण भारतीय जनता पक्षाला तर अडचणीत आणणार आहेच, पण त्यापेक्षा देशाला जास्त संकटात आणणारे ठरेल. मुफ्ती सईद व त्यांच्या कुटुंबीयांचा लौकिक ज्यांना माहीत आहे ते त्यांच्याशी ‘चाय पे चर्चा’ व पुढे हातमिळवणी करण्यास धजावले नसते. म्हणून भाजपच्या धाडसाची, हिमतीची व जिद्दीची कमाल वाटते. मुफ्ती यांच्या शपथविधीस स्वत: पंतप्रधान मोदी हजर होते. शपथ ग्रहण होताच मुफ्ती यांनी तेथेच गरळ ओकले व कश्मीरातील निवडणुका पाकिस्तान व अतिरेकी संघटनांच्या मेहेरबानीमुळे पार पडल्या असे सांगून आपण लांडग्याच्या अवलादीचेच असल्याचे दाखवून दिल्याची टीका शिवसेनेने केली आहे.