रोज ३.५ लाख नागरिकांना मेट्रो प्रवास शक्य

0
10

नागपूर – दररोज सुमारे साडेतीन लाख नागपूरकर मेट्रो रेल्वेचा वापर करतील. मेट्रोच्या स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी बाइक शेअरिंग स्टेशन, वातानुकूलित फीडर बस सर्व्हिस या सुविधा उपलब्ध होणार आहेत. मेट्रो रेल्वेच्या प्रकल्पात जास्तीत जास्त प्रमाणात सौरऊर्जेचा वापर होणार आहे. उपराजधानीच्या सौंदर्यात भर घालणार्‍या मेट्रो स्थानकाच्या आकर्षक इमारतींसह अनेक वैशिष्ट्यपूर्ण बाबींचा नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पात समावेश राहणार आहे. २०१८ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे (एनएमआरसी) व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित यांनी बुधवारी ही माहिती दिली. नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात दीक्षित यांनी या प्रकल्पाचा आराखडा सादर करताना प्रकल्पातील वैशिष्ट्यपूर्ण बाबींकडे लक्ष वेधले. वाहनांचे प्रदूषण आणि वाहतुकीच्या कोंडीची समस्या अद्याप गंभीर बनलेली नसताना उपराजधानीत मेट्रो रेल्वे प्रकल्प उभारला जात असल्याने नागपूरकर भाग्यवान असल्याचे सांगून दीक्षित म्हणाले, देशभरातील मेट्रो प्रकल्पांचा अनुभव नागपुरात कामी येणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प अद्वितीय असाच असेल. नागपुरात वर्षभर सूर्यप्रकाश उपलब्ध होणार असल्याने या प्रकल्पाच्या सर्वच टप्प्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सौरऊर्जेचा वापर होणार आहे. २०१८ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य असून रोज साडेतीन लाख लोक मेट्रो रेल्वे सेवेचा वापर करतील.’

स्थानकांची वैशिष्ट्ये
मेट्रोच्या सर्वच स्थानकांच्या इमारती वैशिष्ट्यपूर्ण राहणार आहेत. जमिनीवरून काही मीटर उंचावरील दोन्ही मार्गांचे जंक्शनचे ठिकाण असलेल्या मुंजे चौकात काही मीटर उंचीवर उभारले जाणारे स्टेशन अत्यंत आकर्षक पद्धतीचे असेल.