भू-संपादन: मोदीविरोधात अण्णांचा ‘लाँन्ग मार्च’

0
28

वर्धा – जमीन अधिग्रहणांसदर्भातील ‘भूसंपादन विधेयका‘च्या विरोधात नियोजित पदयात्रेबाबत भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे प्रणेते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी आज (सोमवार) आपल्या सहकाऱ्यांसोबत चर्चा केली.

वर्धा येथील सेवाग्राम आश्रमापासून ते दिल्लीपर्यंत ही पदयात्रा काढण्यात येणार आहे. अण्णा हजारे काल (रविवार) रात्री वर्धा येथे आले. दिल्लीतील रामलीला मैदानावर ही पदयात्रा संपणार आहे. तिथे कोणत्याही राजकीय नेत्याला व्यासपीठावर येऊ देणार नाही, असे अण्णांनी सांगितले.
सेवाग्राममधील बापू कुटीनजीक यात्रा निवासामध्ये त्यांनी सहकाऱ्यांसोबत खाजगीत चर्चा केली. येथेच महात्मा गांधींचा आश्रम आहे. पदयात्रा सेवाग्रामपासून नवी दिल्लीपर्यंत पोचायला अडीच महिने लागतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
या बैठकीत पदयात्रेचा मार्ग, तारखा, वेळा आदी रूपरेषा ठरविण्यात आली. त्यानुसार, 23 मार्चला शहीद भगतसिंग यांच्या पंजाबमधील स्मारकाचे दर्शन घेऊन पदयात्रेला सुरुवात होईल तर 25 मार्चपासून ही पदयात्रा वर्ध्यातून दिल्लीकडे कूच करेल. सुमारे महिनाभर ही पदयात्रा 2100 किमीचे अंतर व सहा-सात राज्यात प्रवास करीत 27 एप्रिलपर्यंत ही पदयात्रा दिल्लीत पोहचेल. दरम्यान, या बैठकीला आम आदमी पक्षाचे नेते योगेंद्र यादव यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले आहेत.
अण्णा हजारे यांनी सुमारे महिनाभर देशाच्या विविध भागातून पदयात्रा काढण्याचे जाहीर केले आहे. वर्धा ते दिल्ली हा प्रवास बहुतेक भाजपशासित राज्यातून होणार आहेत. महाराष्ट्रातून ही पदयात्रा पुढे गुजरातचा काही भाग घेऊन मध्यप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, यूपी, हरयाणा आदी राज्याला गवसणी घालून 27 एप्रिलच्या दरम्यान दिल्लीत पोहचणार आहे. यातील युपी हे राज्य वगळले तर सर्व ठिकाणी भाजपची सरकारे आहेत. ही पदयात्रा सुमारे 2100 किमी लांबीची असेल. यादरम्यान हे विधेयक शेतकरीविरोधी कसे आहे याबाबत माहिती दिली जाईल. पोस्टर, पथनाट्ये आदी कलात्मक पद्धतीने या विधेयकाविरोधात जनजागृती करण्यात येणार आहे. भाजपचे सरकार असलेल्या राज्यातील शेतक-यांतच भूसंपादन विधेयकाबाबत जनजागृती करण्याचा मनोदय अण्णांनी व्यक्त केल्याचे दिसून येत आहे.