अशोक चव्हाणांनी प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली!

0
12

मुंबई- माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण यांनी आज महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. मावळते प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी चव्हाण यांच्याकडे कारभार सोपवला. गेल्या पाच वर्षांपासून अडथळ्यांच्या शर्यती पार करतच वाटचाल सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणूनही बरेच अडथळे असले तरी सर्वांच्या आशीर्वादाने शुभेच्छांनी ही शर्यतही यशस्वी जिंकू. राणे आमचेच आहेत. त्यांची काही नाराजी असणार नाही, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.
मुंबईतील दादर येथील टिळक भवनातील प्रदेश कार्यालयात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष खासदार चव्हाण यांनी आज दुपारी कार्यभार स्वीकारला. याप्रसंगी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, मावळते प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकूल वासनिक, गुरूदास कामत, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, शिवराज पाटील, विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, शिवाजीराव पाटील निलंगेकर, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय निरूपम, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी बालाराम बच्चाड व श्योराज जीवन वाल्मिकी आदी नेते उपस्थित होते.