आज ठरणार नागपुरात नक्षलविरोधी अ‍ॅक्शन प्लॅन

0
12
file photo

गोंदिया,दि.24 : तेलंगणा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमधील विधानसभेच्या आगामी निवडणुकांदरम्यान नक्षलवाद्यांकडून कोणताही उपद्रव होऊ नये, यासाठी चार राज्यातील पोलीस अधिकारी बुधवारी नागपुरात एकत्र येऊन विचारमंथन करणार आहेत. सुराबर्डीच्या नक्षलविरोधी अभियान केंद्रात (एएनओ) पार पडणाऱ्या या बैठकीसाठी महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी मंगळवारी रात्री नागपुरात पोहोचले. तेलंगणातील अधिकारी सकाळपर्यंत येथे पोहोचणार आहेत.
तेलंगणा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. ही तिन्ही राज्ये महाराष्ट्राच्या गडचिरोली- गोंदिया जिल्ह्याच्या सीमेलगत आहेत. या तिन्ही राज्यात नक्षलवाद तीव्र आहे. तेथे नक्षलवादी नेहमीच मोठमोठ्या घातपाती घटना घडवितात.
विशेष म्हणजे, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षलप्रभावित भागात हिंसक कारवायांचे प्रमाण अचानक वाढते. उपरोक्त राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांत नक्षलवादी मोठा घातपात घडविण्याचे संकेत आहेत. तसा इशारा गुप्तचर यंत्रणांकडून मिळाला आहे. ते लक्षात घेता नक्षलवाद्यांचा उपद्रव रोखून त्यांची कोंडी करण्यासाठी प्रभावी व्यूहरचना करण्याचे निर्देश केंद्रातून जारी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर नागपुरात सुराबर्डीच्या एएनओ केंद्रात बुधवारी, २४ आॅक्टोबरला एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश अशा चार राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार असून, निवडणुकीच्या तोंडावर अथवा निवडणुकीच्या दरम्यान नक्षल्यांचे कटकारस्थान कसे उधळायचे, त्यासंबंधीचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला जाणार आहे. त्यासाठी मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील नक्षलविरोधी अभियानाच्या पोलीस महासंचालकांसह अनेक वरिष्ठ अधिकारी मंगळवारी रात्री नागपुरात दाखल झाले. राज्याच्या एएनओचे महासंचालक डी. कनकरत्नम तसेच पोलीस महानिरीक्षक संजय सक्सेना यांनी शनिवारी एएनओला भेट दिली आहे.